गडचिरोली जिल्ह्यात एकल महिलांचा मोठा आकडा उघड
– आर्थिक सक्षमतेसाठी प्रशासन सज्ज
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : गडचिरोली जिल्ह्यातील एकल महिलांची वास्तविक स्थिती समोर आणणारे महत्त्वपूर्ण सर्वेक्षण जिल्हा परिषदेने पूर्ण केले असून, या सर्वेक्षणात २५ हजार ७३२ एकल महिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी प्रशासनाने व्यापक व नियोजनबद्ध कृती आराखडा आखला आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या पुढाकारातून हे सर्वेक्षण राबवण्यात आले. त्यानंतर उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांचे सामाजिक, आर्थिक व कौशल्याधारित सखोल अध्ययन करण्यात आले. या अभ्यासाच्या आधारे एकल महिलांसाठी रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार आणि उद्यमशीलतेवर भर देणारे विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
सर्वेक्षणानुसार, जिल्ह्यातील एकल महिलांमध्ये २२ हजार ६४६ विधवा, १ हजार १४९ घटस्फोटीत, ४०७ परित्यक्ता आणि १ हजार ७४ प्रौढ अविवाहित महिलांचा समावेश आहे. सामाजिक प्रवर्गाचा विचार करता, यामध्ये ७ हजार ७१६ अनुसूचित जमातीच्या व २ हजार ८६३ अनुसूचित जातीच्या महिला असून उर्वरित महिला इतर प्रवर्गातील आहेत.
उमेद अभियानाच्या अभ्यासानुसार रोजगारक्षम महिलांमध्ये २० ते ४० वयोगटातील ३ हजार ७७१, ४१ ते ५० वयोगटातील ४ हजार ९११, तर ५१ ते ६० वयोगटातील ५ हजार ६२९ महिला आहेत. ६० वर्षांखालील एकूण १४ हजार ३११ महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
आर्थिक सक्षमतेच्या दिशेने आतापर्यंत खेळत्या भांडवलातून ११ हजार ५८४ महिलांना, समुदाय गुंतवणूक निधीतून ६ हजार ३१८ महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय बँकांमार्फत ७२१ आणि वंचितता प्रवण निधीतून १ हजार ७२१ महिलांना कर्ज देण्यात आले असून, या माध्यमातून महिलांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल मिळाले आहे. सध्या ५६९ एकल महिला उत्पादक गटांमध्ये सामील होऊन सामुदायिक पद्धतीने व्यवसाय करत आहेत.
एकल महिलांच्या व्यवसायांना गती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रोजगार प्रेरणा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचे सीईओ सुहास गाडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शासकीय योजनांचा आढावा घेतला असता संजय गांधी निराधार योजना १२ हजार २५२, लाडकी बहीण योजना ५ हजार २१६, श्रावण बाळ योजना १ हजार ७८० महिलांना लाभ मिळत असल्याचे आढळले. मात्र २ हजार ७४८ महिलांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले असून, अशा महिलांना तातडीने पात्र योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेतली जाणार आहे.
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात एकल महिलांच्या रोजगारनिर्मितीतून स्वयंपूर्णतेचे आदर्श मॉडेल उभारण्याचा संकल्प प्रशासनाने व्यक्त केला असून, या उपक्रमातून हजारो महिलांच्या जीवनात सकारात्मक व शाश्वत परिवर्तन घडवण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे.














