अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

423

The गडविश्व
मुंबई : मुंबई आणि उपनगरांच्या परिसरात अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखून संबंधितांवर कडक कारवाई करावी असे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
विधानभवन येथे राज्यातील अंमली पदार्थांची विक्री व सेवन याविरोधात कारवाई करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीस संजय सक्सेना, प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक, का. स. सु., व अन्य अधिकारी उपस्थित होते.
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, मुंबई आणि उपनगरांच्या परिसरात अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाचे प्रमाण विशेषत्वाने आढळून येत असून ही बाब गंभीर असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरूद्ध सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय राखून संबंधितांवर कडक कारवाई करावी. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. यासंदर्भातील कर्तव्यात कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येईल. अमली पदार्थांची तस्करी आणि सेवनापासून तरूण पिढीला दूर ठेवण्याची गरज असून यासंदर्भात शाळा व महाविद्यालयांतही प्रबोधन करण्याचे निर्देशही देसाई यांनी यावेळी दिले.
मुंबई आणि उपनगरांच्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणांमध्ये काही परदेशी नागरिक आढळून आले असून यांची ओळख पटविण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने त्यादृष्टीने अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणेद्वारे त्यांची ओळख पटवून या समस्येवर मात करण्यात येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here