मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात दिभना ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल; ५० लाखांचे पारितोषिक

13

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात दिभना ग्रामपंचायत जिल्ह्यात अव्वल; ५० लाखांचे पारितोषिक
– चोप ग्रामपंचायतीला द्वितीय, तर देऊळगावला तृतीय क्रमांक; विजेत्या ग्रामपंचायतींना एक कोटींचे पुरस्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामगिरीचा निकाल जाहीर झाला असून, गडचिरोली तालुक्यातील दिभना ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. देसाईगंज तालुक्यातील चोप ग्रामपंचायतीने द्वितीय, तर आरमोरी तालुक्यातील देऊळगाव ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला. या तीनही विजेत्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख आणि २० लाख रुपये असे एकूण एक कोटी रुपयांचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या पुरस्कारांचे वितरण तसेच आगामी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७ च्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सुहास गाडे यांनी ग्रामपंचायतींना ग्रामीण विकासाचा कणा संबोधत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आगामी २०२६-२७ च्या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा. केवळ जिल्हास्तरावरच नव्हे, तर राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेत आगामी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतींच्या कामकाजात सुधारणा, लोकसहभाग वाढविणे आणि विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, चेतन हिवंज, कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख व सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पंकज भोयर यांनी केले. सूत्रसंचालन शेषराव नागमोती यांनी केले, तर जिल्हा व्यवस्थापक (पेसा) प्रमोद भोयर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here