‘मच्छर से टक्कर – बुखार से मुक्ती’ : गडचिरोलीत हिवताप निर्मूलनासाठी भव्य जनजागृती अभियानाचा शुभारंभ
-सहा चित्ररथांच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत पोहोचणार आरोग्य संदेश
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप (मलेरिया) व इतर कीटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. आरोग्य विभाग, गडचिरोली आणि गोदरेज पुरस्कृत ‘EMBED’ प्रकल्प – फॅमिली हेल्थ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मलेरियामुक्त गडचिरोली अभियान’ अंतर्गत “मच्छर से टक्कर – बुखार से मुक्ती” या विशेष जनजागृती मोहिमेचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते सहा भव्य जनजागृती चित्ररथांना हिरवी झेंडी दाखवून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे प्रमुख उपस्थित होते.
भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत आरोग्यविषयक माहिती प्रभावीपणे पोहोचावी, या उद्देशाने सहा विशेष सजवलेले चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. हे रथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरून हिवताप, डेंग्यू यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी, स्वच्छतेचे महत्त्व, मच्छरदानीचा वापर आणि त्वरित उपचारांची माहिती देणार आहेत.
ऑडिओ संदेश, भित्तीपत्रके, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी यावेळी सांगितले की, “जनसहभाग आणि प्रभावी जनजागृतीच्या बळावर हिवतापाचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल. मलेरियामुक्त गडचिरोली हे आपले सामूहिक ध्येय आहे.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे, साचलेले पाणी त्वरित काढून टाकण्याचे आणि नियमितपणे मच्छरदानीचा वापर करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल गोरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजाता वाडिवे, धानोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज हेमके यांच्यासह जिल्हा परिषद व जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिवतापावर मात करण्यासाठी आणि ‘मलेरियामुक्त गडचिरोली’चे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. या मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.














