गडचिरोली : खर्रासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर, पत्नी घरातून बेपत्ता
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २९ : खर्रा खाण्यासाठी पतीकडे पैसे मागितल्यानंतर पैसे देण्यास नकार मिळाल्याने संतप्त झालेली महिला घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना धानोरा तालुक्यातील खुटगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाविका प्रमोद मेश्राम (वय ४१, रा. खुटगाव, ता. धानोरा, जि. गडचिरोली) असे बेपत्ता महिलेचे नाव असून, या प्रकरणी चातगाव पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
पती प्रमोद मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भाविका मेश्राम हिने खर्रा खाण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रमोद मेश्राम शेतावर कामासाठी निघून गेले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरी परतल्यानंतर मुलगा दुष्यंत मेश्राम याने आई भाविका ही दुपारी १२ वाजताच्या सुमारास चातगाव येथे बाजार करण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्याचे सांगितले.
सायंकाळ झाली तरी भाविका घरी परत न आल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. दरम्यान, गावातील ऑटोचालक राजेश याने खुटगाव–चातगाव मार्गावर भाविका मेश्राम हिला पायी जाताना पाहिल्याची माहिती दिली. अखेर चातगाव पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली.
बेपत्ता महिलेचे वर्णन : बांधा मजबूत, उंची अंदाजे ५ फूट, रंग सावळा, केस काळे, चेहरा गोल. अंगात हिरव्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलेला आहे.
ही महिला कुणाला आढळून आल्यास ९४०३२४९६७१, ९४०३४४०९१५ किंवा ७७०९७३४७५३ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














