लगाम हेटीत पेसा निधीतून उभारलेल्या हातपंपाचे लोकार्पण
The गडविश्व
मुलचेरा, दि. २९ : मुलचेरा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत लगाम अंतर्गत लगाम हेटी येथे पेसा योजनेंतर्गत ५ टक्के थेट निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन हातपंपाचे उद्घाटन मंगळवार २७ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. सदर उद्घाटन विजय एल. पेंदाम, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुलचेरा यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत लगामचे सरपंच दिपक मडावी, पेसा अध्यक्ष मधुकर मडावी, महिला प्रतिनिधी वनश्री पेंदाम, तालुका व्यवस्थापक (पेसा) आकाश आंबोरकर तसेच अजय मोटघरे व प्रशांत कोल्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून हातपंपाचे लोकार्पण करण्यात आले.
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या लक्षात घेऊन ग्रामसभेच्या ठरावानुसार या कामास पेसा निधीतून मंजुरी देण्यात आली होती. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सातत्यपूर्ण पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी राकेश टी. दुर्गे, पेसा मोबिलायझर सुरेखा मडावी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभा पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला बचतगटांच्या प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातपंप कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर अंतरावर जावे लागणार नसून, विशेषतः महिला, वृद्ध नागरिक व लहान मुलांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा प्रभावी वापर करून स्थानिक गरजांनुसार विकासकामे राबविण्याचे आवाहन केले. पेसा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अशा लोकाभिमुख व मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या उपक्रमांमुळे आदिवासी भागाच्या विकासाला चालना मिळत असून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी पेसा निधीतून उपलब्ध झालेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासन, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.














