प.हं. राधेश्याम बाबा पुण्यतिथी उत्सव तथा महासिद्ध यात्रा ३१ जानेवारीपासून
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २७ : तालुक्यातील लेखा येथे परमहंस राधेश्याम बाबा सेवा समितीच्या वतीने प.हं. राधेश्याम बाबा पुण्यतिथीनिमित्त ३१ जानेवारी २०२६ रोजी महासिद्ध यात्रा तसेच १ फेब्रुवारी २०२६ रोजी गोपाळकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या यात्रेत परिसरातील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने या धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
धानोरा मुख्य मार्गालगत असलेल्या श्री राधेश्याम बाबा मंदिरात होणाऱ्या या उत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता नियम स्वच्छतेने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून सकाळी ५ वाजता सामूहिक ध्यान होईल. सकाळी ८ वाजता श्री राधेश्याम बाबा पुण्यनगरी लेखा येथून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात लेखा, राजोली, कन्हारटोला, मेंढा आदी गावांतील भजन मंडळे, महिला मंडळे व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
दुपारी ११ वाजता घटस्थापना व अभिषेक कार्यक्रम ह.भ.प. गंगाधर पाल, ह.भ.प. पुंडलिकजी बुराडे महाराज, देवजी तोफा (गाव पुजारी, लेखा), अर्जुन सोमनकर (धानोरा) व यशवंतजी मोहर्ले महाराज यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता रुक्मिणी भजन मंडळ, धानोरा यांचे भजन होणार असून सायंकाळी ७ वाजता सामूहिक प्रार्थना व हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ८.३० वाजता ह.भ.प. टीकारामजी बघमारे महाराज (बरडकिन्ही) यांचे किर्तन व भजन सादर होणार आहे.
उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता नियम स्वच्छता, सकाळी ५ वाजता सामूहिक ध्यान व हरिपाठ, सकाळी ६ वाजता ह.भ.प. डॉ. नवलाजी मुळे यांचे ग्रामगीतेवर मार्गदर्शन होणार आहे. सकाळी ७ वाजता धानोरा येथून राधेश्याम बाबा भव्य पालखी मिरवणूक निघणार असून त्यात तालुक्यातील विविध भजन मंडळे व वारकरी सहभागी होणार आहेत.
सकाळी ८ वाजता भजन कार्यक्रम, सकाळी ११ वाजता ह.भ.प. गंगाधर चौधरी महाराज (डोंगरगाव) यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर गोपाळकाला व दुपारी २ वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता सामुदायिक भजन व प्रार्थना तर रात्री ८ वाजता ह.भ.प. उमाकांत रेचनकर (नवेगाव) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या महासिद्ध यात्रेचा, गोपाळकाला व महाप्रसादाचा लाभ परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन परमहंस राधेश्याम बाबा सेवा समिती व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.














