मराठी भाषेचा वारसा प्रत्येकाने जोपासावा

25

मराठी भाषेचा वारसा प्रत्येकाने जोपासावा
न्यायमूर्ती तथा तालुका न्यायदंडाधिकारी एन.पी. देशपांडे यांचे प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : मराठी भाषा हा हजारो वर्षांचा समृद्ध, प्राचीन आणि सांस्कृतिक वारसा असून या भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचे संवर्धन व जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर प्रथम श्रेणी, कुरखेडा येथील न्यायमूर्ती तथा तालुका न्यायदंडाधिकारी एन.पी. देशपांडे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कुरखेडा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, न्यायालयीन कामकाजात पक्षकारांच्या बोलीभाषेतून निकाल दिल्यास त्यांना निर्णय अधिक सहज समजेल. शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून श्रीराम उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडा येथील प्रा. विनोद नागपूरकर उपस्थित होते. त्यांनी मराठी भाषेचा गोडवा आणि चिरंतनता टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी अमराठी लोकांशीही मराठीतून अधिकाधिक संवाद साधावा, मराठी भाषेबद्दल आपुलकी निर्माण करावी, असे आवाहन केले. यासोबतच मराठी भाषेचा इतिहास, साहित्य व सांस्कृतिक परंपरा यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर अधिवक्ता ए.पी. नाकाडे, अधिवक्ता उमेश वालदे, अधिवक्ता जी.एस. नागमोती व अधिवक्ता रूपाली माकडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता ए.पी. नाकाडे यांनी केले, तर आभार अधिवक्ता जी.एस. नागमोती यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी सहाय्यक अधीक्षक एस.टी. सहारे, वरिष्ठ लिपिक के.एल. आमटे, वरिष्ठ लिपिक आवळे, कनिष्ठ लिपिक के.बी. गेडाम तसेच न्यायालयीन शिपाई अंकुश मच्छीरके यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here