मुख्यमंत्री कार्यालयाकडून रांगी गावातील विकास कामांची दखल

15

मुख्यमंत्री कार्यालयाकडून रांगी गावातील विकास कामांची दखल
– प्रत्यक्ष पाहणी व चित्रीकरण
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १७ : धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसहभागातून राबविलेल्या विविध विकासात्मक उपक्रमांची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) समितीने रांगी गावास प्रत्यक्ष भेट देत पाहणी व चित्रीकरण केले.
रांगी ग्रामपंचायतीच्या वतीने महाश्रमदानाच्या माध्यमातून वनराई बंधारा, वृक्षलागवड, परसबागा, क्रीडांगण, सार्वजनिक जागांचा विकास असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, गावकरी, महिला मंडळ, बचतगट यांनी एकत्र येऊन साकारलेल्या या कामांची मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष दखल घेतली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत संवर्ग विकास अधिकारी एस. एम. वानखेडे यांच्या नेतृत्वात व पंचायत विस्तार अधिकारी बबलू आत्राम यांच्या उपस्थितीत जळगाव येथील कुणाल भोई यांनी संपूर्ण गावाचे चित्रीकरण केले.
यावेळी पशुधन विकास अधिकारी मीनल सोनटक्के, महिला व बालकल्याण अधिकारी गेडाम, अंगणवाडी सुपरवायझर राणी टेकाम, सरपंच मान. श्रीमती फालेश्वरी प्रदीप गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्वे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हेमंत काटेंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
सीएमओ समितीने गावात फेरी काढून स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमधील उपक्रम, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम यांचे चित्रीकरण केले. यानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, रांगी येथे सिकलसेल व अॅनिमिया तपासणी शिबिर, तर ग्रामपंचायत कार्यालयात आयुष्मान गोल्डन कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते.
अंगणवाडी क्रमांक १, २ व ३ येथे तयार करण्यात आलेल्या पोषण आहार प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली. तसेच उमेद व एमएसआरएलएम अंतर्गत कार्यरत बचतगटांच्या उल्लेखनीय उपक्रमांचेही चित्रीकरण करण्यात आले. महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या, तसेच गावातील धार्मिक स्थळांवरील दैनंदिन उपक्रम कॅमेऱ्यात टिपण्यात आले.
यावेळी उपसरपंच नुरज सुरेश हलामी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत साळवे, राकेश कोराम, दिनेश चापडे, शशिकला मडावी, विद्याताई कपाट, वच्छलाताई हलामी, अर्चना मेश्राम, अंगणवाडी सेविका मंदाबाई वरवाडे, सुनिता भुरसे, ज्योती कुकडकर, उमेद अंतर्गत कार्यरत सुरेखाताई रंगारी, आशुताई कपाट, शशिकला भुरसे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष तुळशीराम भुरसे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती अध्यक्ष शांताराम बर्डे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अध्यक्ष ज्योती यशवंत गेडाम, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
गावातील भजन मंडळींच्या दिंडीद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामसभा सदस्य, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here