कुरखेडा : जंगलातून थेट घरात बिबट्याची एंट्री, येडापूरात दुपारीच थरार

83

कुरखेडा : जंगलातून थेट घरात बिबट्याची एंट्री, येडापूरात दुपारीच थरार
– गावकऱ्यांचा सुटकेचा निःश्वास
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.३० : तालुक्यातील जंगलाने वेढलेल्या येडापूर गावात सोमवारी (दि. २९ डिसेंबर) दुपारी अचानक बिबट्याने घरात शिरकाव केल्याने गावात एकच खळबळ उडाली. येडापूर येथील सुखदेव कवडो यांच्या घरात दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास बिबट या हिंस्र वन्यप्राण्याने थेट प्रवेश करत घरातील बाथरूममध्ये ठाण मांडले. दिवसा ढवळ्या घरात बिबट दिसताच कवडो कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी तत्काळ घराबाहेर धाव घेत गावकऱ्यांना मदतीसाठी हाक दिली.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र कार्यालय, पूराडा येथे कळविले. माहिती मिळताच वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक बी. आर. वरुण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जोजिन जॉर्ज, सहाय्यक वनसंरक्षक रविंद्र सूर्यवंशी, पूराडा वनपरिक्षेत्र अधिकारी रवि चौधरी, कुरखेडा वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड, पूराडा क्षेत्र सहाय्यक नंदकुमार पोले, कुरखेडा क्षेत्र सहाय्यक संजय कंकलवार, सोनसरी क्षेत्र सहाय्यक अमोल राऊत तसेच पूराडा, कुरखेडा, मालेवाडा, देलनवाडी व वडसा येथील वनकर्मचारी पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने व काळजीपूर्वक कारवाई करत घरात पिंजरा लावला. तब्बल साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी ७.३० वाजता बिबट पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. बिबट जेरबंद होताच कवडो कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
यानंतर जेरबंद बिबटला पूराडा वनपरिक्षेत्र कार्यालयात सुरक्षितपणे आणण्यात आले. सदर बिबटला मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) लोकवस्तीपासून दूर, त्याच्या नैसर्गिक अधिवास असलेल्या घनदाट जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
#thegdv #thegadvishva #leopard_rescue #yedapur_news #kurkheda_taluk #gadchiroli_news #forest_department #wildlife_rescue #leopard_captured #human_wildlife_conflict

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here