मावळत्या वर्षाला रक्तदानाने निरोप, नववर्षाचे सामाजिक स्वागत
– नगरसेवक सागर निरंकारी यांचे युवकांना सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३० : शहरात मावळत्या वर्षाला रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून निरोप देण्याची आणि नववर्षाचे स्वागत समाजोपयोगी कार्यातून करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहणार आहे. स्वर्गीय विक्रांत वारजूरकर व स्वर्गीय जिग्नेश धंधूकीया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या १६ वर्षांपासून येथील युवक मंडळी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवत असून, यावर्षीही ३१ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सागर निरंकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
अलीकडे नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली होणारा धिंगाणा, व्यसनाधिनता आणि अपप्रवृत्ती युवक पिढीला चुकीच्या दिशेने नेत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्टी संस्कृतीतूनच नव्या पिढीत नको त्या व्यसनांचा शिरकाव होत असल्याने, या चुकीच्या परंपरेला फाटा देण्यासाठी कुरखेड्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांनी रक्तदानाचा सकारात्मक मार्ग स्वीकारला आहे. युवकांनी वर्षाचा निरोप व नववर्षाचे स्वागत हुडदंगाने नव्हे, तर सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून करावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाला गेल्या १६ वर्षांपासून नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यावर्षीही बुधवार, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सिंधी भवन, कुरखेडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक सागर निरंकारी यांच्यासह मधुकर वारजूरकर, यशपाल सहारे, सोनू रहांगडाले, विवेक निरंकारी, प्रवेश सहारे, मयूर सहारे, आशू बागडे, गोलू वैद्य, नौशाद सय्यद, पंकज टेंभूर्णे आणि विनायक ठाकरे यांनी केले आहे.
रक्तदानातूनच नववर्षाचे स्वागत करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Kurkheda #BloodDonationCamp #NewYearWithSocialCause #FarewellToOldYear #SaveLifeDonateBlood #YouthForSociety #SocialResponsibility #CouncillorAppeal #PositiveCelebration #NoToHooliganism














