चातगाव येथे पेसा दिनानिमित्त विशेष ग्रामसभा ; ‘विकसित भारत जी-रोजगार योजना’ विधेयकाची जनजागृती
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. २९ : तालुक्यातील ग्रामपंचायत चातगाव येथे पेसा दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोपाल उईके होते. सभेच्या प्रारंभी आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पेसा मोबिलायझर सौ. आरती कोडाप यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नामांतर करून प्रस्तावित ‘विकसित भारत ग्राम रोजगार योजना’ (Viksit Bharat Gram Rozgar Yojana – VB-GRAM) या नवीन विधेयकाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तहसील कार्यालयातील सहायक ए.पी.ओ. श्रीमती गज्जलवार यांनी या विधेयकातील तरतुदी, ग्रामीण रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास तसेच ग्रामसभेच्या भूमिकेचे महत्त्व मुद्देसूद पद्धतीने स्पष्ट केले. या विधेयकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढवण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
या विशेष ग्रामसभेस ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभासद, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी ग्रामपंचायत अधिकारी रणजित राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #dhanoranews #latestnews #localnews














