महाडिबीटी शिष्यवृत्तीला ‘डेडलाईन अलर्ट’ : उशीर झाल्यास अर्ज थेट ‘ऑटो रिजेक्ट’

44

महाडिबीटी शिष्यवृत्तीला ‘डेडलाईन अलर्ट’ : उशीर झाल्यास अर्ज थेट ‘ऑटो रिजेक्ट’
The गडविश्व
गडचिरोली, दि.१९ : महाडिबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर न झाल्यास संबंधित अर्ज प्रणालीतून थेट ‘ऑटो रिजेक्ट’ करण्यात येणार असून, त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचा कडक इशारा समाज कल्याण विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांनी सन 2022-23 ते सन 2024-25 या शैक्षणिक सत्रातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन भरलेले शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर काटेकोरपणे तपासून तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
निर्धारित विहीत मुदतीत पात्र प्रलंबित अर्जांची संपूर्ण तपासणी करून मंजुरी प्रक्रियेसाठी सादर न केल्यास किंवा अर्ज प्रलंबित राहिल्यास, संबंधित अर्ज महाडिबीटी प्रणालीतून आपोआप ‘ऑटो रिजेक्ट’ करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, एकदा अर्ज रद्द झाल्यानंतर पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी किंवा मंजुरीसाठी कोणतीही मुदतवाढ अथवा संधी दिली जाणार नसल्याचेही समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सन 2022-23 ते सन 2024-25 या कालावधीत शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, शैक्षणिक सत्र सन 2025-26 साठी अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नवीन तसेच नुतनीकरणाचे शिष्यवृत्ती अर्ज महाडिबीटी पोर्टलवर स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाविद्यालयीन फी स्ट्रक्चरशी संबंधित आवश्यक कार्यवाही पूर्ण करून, नवीन व नुतनीकरण केलेले संपूर्ण अर्ज योग्यरीत्या तपासून विहीत मुदतीत पुढील कार्यवाहीसाठी या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्या महाविद्यालयांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे, अशा महाविद्यालयांनी नुतनीकरणाचे अर्ज प्राधान्याने व तातडीने सादर करावेत. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्जही वेळेत फॉरवर्ड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निर्धारित मुदतीत विद्यार्थ्यांचे अर्ज या कार्यालयाकडे फॉरवर्ड न केल्यामुळे एखादा पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर राहील. या प्रकरणी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभागाची कोणतीही जबाबदारी राहणार नसल्याचे स्पष्ट करत, सर्व प्राचार्यांनी या सूचनांची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here