आरोग्य सेवेला गती : CSR निधीतून धानोरा तालुक्यास रुग्णवाहिका
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०८ : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम पूर्व भागातील धानोरा तालुक्याला तातडीच्या आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या CSR निधीतून रुग्णवाहिका देण्यात आली असून, या माध्यमातून तालुक्यातील शेकडो नागरिकांना त्वरित व सुलभ वैद्यकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही योजना कार्यान्वित करण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते आणि ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष भाजपा गडचिरोली साईनाथजी साळवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर ही सुविधा धानोऱ्यापर्यंत पोहोचल्याने ग्रामीण भागात समाधान व्यक्त केले जात आहे.
रुग्णवाहिका ’ना नफा ना तोटा’ तत्त्वावर २४ तास सेवा देणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत त्वरित पोहचवण्यासाठी ही सेवा तयार ठेवण्यात आली असून, अल्प दरात तिचा लाभ सर्व नागरिकांना मिळणार आहे.
या उपक्रमाच्या समन्वयात सारंग साळवे यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यांनी वारंवार मागणी रेटून धरत, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात प्रभावी दुवा साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही सुविधा तालुक्याच्या सेवेत दाखल झाली आहे.
धानोरा तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्याची संधी आता अधिक सुलभ झाली असून, आरोग्यसेवा व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.














