कुरखेडा : पोलिसांचा ‘यू-टर्न’! खोटा गुन्हा मान्य, आता FIR रद्दीच्या दिशेने

16

कुरखेडा : पोलिसांचा ‘यू-टर्न’! खोटा गुन्हा मान्य, आता FIR रद्दीच्या दिशेने
The गडविश्व
नागपूर / कुरखेडा, दि. ०८ : कुरखेडा तालुक्यातील चिखली येथील माजी उपसरपंच अनिल मच्छिरके यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या कथित FIR प्रकरणात नाट्यमय कलाटणी आली आहे. तपासात आरोप सिद्ध होत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयात शपथपत्राद्वारे कबूल केले असून ‘B-सारांश’ दाखल करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. परवानगी मिळताच संपूर्ण FIR रद्द होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ही FIR १५ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामसेविका रोशनी साहारे यांनी दाखल केली होती. “धमकी व कर्तव्यात अडथळा” असे आरोप करीत कलम २२१ व २२४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, तेंदूपत्ता बोनस व नलजल योजनेची माहिती RTI द्वारे मागितल्याचा बदला म्हणून ही खोटी तक्रार दाखल झाल्याचा आरोप मच्छिरके यांनी केला होता. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही FIR सूडबुद्धीने करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
१ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कुरखेडा पोलीस स्टेशनतर्फे अतिरिक्त सरकारी वकील ॲड. एन. बी. जावडे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात नमूद आहे की तपास पूर्ण झाला असून साक्षीदारांचे जबान आणि पुरावे गोळा केल्यानंतर आरोप सिद्ध होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे B-सारांश अहवाल तयार असून न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे तो दाखल करता आला नाही, आता त्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. ईश्वरदास दाऊदसरे यांनी प्रतिक्रिया देताना हा RTI कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचा विजय असल्याचे सांगितले. “पोलिसांनीच FIR खोटी असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ही FIR रद्द होण्यासोबतच तक्रारदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,” अशी त्यांची मागणी आहे.
पुढील सुनावणीत न्यायालय B-सारांश दाखल करण्यास परवानगी देण्याची शक्यता असल्याने FIR रद्द होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या घडामोडीमुळे ग्रामीण भागात पारदर्शकतेसाठी RTI चा वापर करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असून संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here