‘मातोश्री पाणंद’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करिता नियमात शिथीलता द्या
– माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यांचे प्रमुख नेत्यांकडे मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : दुर्गम ग्रामीण भागातील शेतांपर्यंत यंत्रसामग्री पोहोचण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २०२१ पासून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना राबविली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि दगड उपलब्धतेचा गंभीर प्रश्न यामुळे या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे अडथळ्यात आली आहे. परिणामी मंजूर कामे रखडली असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता योजनेंतर्गत नियमात शिथीलता देण्याची मागणी कुरखेडा येथील माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यांनी केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष खा. डॉ. फग्गणसिंह कूलस्ते आणि रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या योजनेत कुशल व अकुशल कामांसाठी प्रति किलोमीटर २४ लाखांची तरतूद असून मूरूम, बोल्डर आणि गिट्टी अशा तीन थरांचा मजबूत रस्ता करण्याची स्पष्ट अट आहे. परंतु जिल्ह्यातील दगड साठ्याचा बहुतांश भाग वनविभागाच्या क्षेत्रात असल्याने दगड उत्खननास परवानगी मिळत नाही. त्यामुळे रस्ता बांधकामासाठी आवश्यक दगड १५० किलोमीटर अंतरावरील नागपूर जिल्ह्यातून आणावा लागतो, यामुळे वाहतूक खर्च दुपटीने वाढतो आणि निश्चित निधीत बांधकाम करणे शक्य होत नाही.
स्थानिक परिस्थितीनुसार एक किलोमीटर रस्त्यासाठी किमान ५० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे गोटेफोडे यांनी नमूद केले आहे. विद्यमान नियम व अंदाजपत्रक गडचिरोलीस लागू होत नसल्याने स्वतंत्र अंदाजपत्रके तयार करावीत व दगड वाहतूक खर्चाचा समावेश करून निधी वाढवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गोटेफोडे म्हणाले, ‘ जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीत कठोर निकषांमुळे कामे मार्गी लागत नाहीत. नियम शिथील झाल्यास रखडलेली पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागतील आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.’
सदर योजनेत जिल्ह्यातील काही गावांची कामे मंजूर झाली असली तरी निधी आणि निकषांमुळे ती पूर्णत्वाला पोहोचू शकलेली नाहीत. या संदर्भात गोटेफोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे परिस्थितीची जाणीव करून देत निकष बदलाच्या मागणीवर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले आहे.














