दखणे विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०६ : स्व. रामचंद्रजी दखने विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात आज, शनिवार ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन आदरपूर्वक साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा शुभारंभ विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण बोरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाल अर्पण करून करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सतीश सुरणकर, जयेश अंबादे, विलास चौधरी, रामाधर राणा, सुरेश तुलावी, रमेश निसार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक बोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना, “माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे महामानव म्हणजे बाबासाहेब,” असे सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा व इतिहासाचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सुरणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन जयेश अंबादे यांनी मानले.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.














