-लाखोंची उलाढाल सुरू असताना पोलिस प्रशासनाचे मौन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा(चेतन गहाणे), दि. ०३ : पूर्व विदर्भाच्या झाडीपट्टी भागातील सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेली देव मंडई आता कुरखेडा तालुक्यात गंभीर धोक्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या परंपरा, निसर्गपूजा आणि लोककलांना जपणारा हा वारसा सध्या अवैध कोंबडे बाजार, जुगार आणि सट्टेबाजीच्या जाळ्यात अडकत चालला आहे. धार्मिक उत्सवाच्या आडून दररोज लाखों रुपयांची उघडपणे उलाढाल होत असून, संपूर्ण मंडईचे स्वरूपच विकृत झाले आहे.
परंपरेवर सट्ट्याचा काळा डाग
दिवाळीनंतर तालुक्यातील अनेक गावांत देव मंडई साजरी केली जाते. प्रभातफेरी, ध्वजपूजन, निसर्गभक्ती आणि झाडीपट्टीतील रंगभूमी या सगळ्यांमधून लोकजीवनाचा उत्सव दिसतो. पण या पवित्र परंपरेची जागा आता कोंबडे झुंजी, लुडो-जुगार आणि सट्टेबाजांच्या गर्दीने घेतली आहे. कोंबड्यांच्या रक्तरंजित झुंजींवर हजारो-लाखो रुपये लावले जात असून, मंडई परिसर जुगार अड्ड्यात बदलला आहे.
युवकांचे आयुष्य जुगारीत ढकलले
ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात या अवैध धंद्यांमध्ये ओढले जात आहेत. एका दिवसाच्या कमाईच्या लालसेने सुरू झालेले हे व्यसन घराघरांत आर्थिक संकट आणि सामाजिक तणाव निर्माण करत आहे. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची धक्कादायक माहिती स्थानिकांनी दिली.
पोलिस प्रशासन ‘गायब’ – नागरिकांची संतापपूर्ण प्रतिक्रिया
जिल्ह्यातील इतर भागात कोंबडे बाजार आणि जुगारांवर कारवाई होत असताना कुरखेडा तालुक्यात मात्र पोलिसांची पावले थांबलेली दिसतात. पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले असतानाही स्थानिक पोलीस कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“मंडई सट्टेबाजांच्या ताब्यात गेली आहे, मग पोलिसांचा ताबा कुठे आहे?” असा सरळ सवाल उपस्थित केला जात आहे.
तातडीच्या कारवाईची मागणी
देव मंडईचा सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी विशेष मोहीम राबवावी, सातत्याने छापे घालावे आणि मंडई परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे, अशी एकमुखी मागणी नागरिक आणि स्थानिक पत्रकारांकडून होत आहे.
झाडीपट्टीची अमूल्य परंपरा जपायची असेल तर अवैध सट्टा थांबवणे आणि देव मंडईला पुन्हा तिच्या संस्कृतीकडे परत नेणे अत्यावश्यक आहे, असा स्पष्ट संदेश आता जनतेतून उमटतो आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #IllegalCockfighting #GamblingRacket #CulturalHeritageAtRisk #Gadchiroli #Kurkheda #Zadipatti #DevMandai #RuralCrime #LawAndOrder #PoliceInaction #BreakingNews #LocalNews India














