आरमोरीत ‘युवांचा स्वयंविकास’ एकदिवसीय शिबिर उत्साहात संपन्न
– निर्माण उपक्रमांतर्गत व्यसनमुक्ती व जागरूकतेवर भर
The गडविश्व
आरमोरी दि. २७ : चातगाव येथील सर्च फाउंडेशनच्या निर्माण उपक्रमाअंतर्गत हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, आरमोरी येथे ‘युवांचा स्वयंविकास’ या विषयावर आधारित एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाची दिशा देणे, जागरूकता निर्माण करणे आणि स्व-विकासाची गरज अधोरेखित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
शिबिरात व्यसनमुक्ती मार्गदर्शन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांसाठी ५०% कमी किमतीत पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. व्यसनाधीनतेकडे वाढणारी तरुणाईची प्रवृत्ती रोखण्यासाठी आणि समाजात निर्व्यसनी जीवनमूल्यांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
निर्माण उपक्रमाचे समन्वयक अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प सहाय्यक प्रज्वल सोनलवर, समुपदेशक प्रियंका साळवे, तसेच मुक्तिपथ आरमोरीचे तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी मार्गदर्शन केले.
उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य फुलझेले सर यांच्या सहकार्याने पर्यवेक्षक प्रा. बाहेकर सर, प्रा. प्रधान, प्रा. दोनडकर, प्रा. सहारे, प्रा. शिलारे यांनी शिबिरात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.














