अमिर्झा ग्रामपंचायतीत जागतिक हिंसाचार दिनानिमित्त जनजागृती ; महिलांच्या हक्कांवर भर

15

अमिर्झा ग्रामपंचायतीत जागतिक हिंसाचार दिनानिमित्त जनजागृती; महिलांच्या हक्कांवर भर
– ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्डतर्फे उपयुक्त मार्गदर्शन
The गडविश्व
अमिर्झा, दि. २७ : महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध आणि त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ममता हेल्थ इन्स्टिट्यूट फॉर मदर अँड चाईल्ड, जागृती फेस-4 यांच्या वतीने ग्रामपंचायत सभागृहात जागतिक हिंसाचार दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांनी सुरक्षित आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी आवश्यक माहिती समाजापर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा समन्वयक प्रतीक अवथरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराची वाढती व्याप्ती, त्याचे प्रकार तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 याबाबत सविस्तर माहिती दिली. महिलांनी स्वतःचे हक्क जाणून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
PSI माधुरी मिसार यांनी व्यसनाधीनतेमुळे उद्भवणाऱ्या हिंसाचाराचे स्वरूप स्पष्ट केले. घरगुती किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारांविरोधात महिलांनी त्वरित आवाज उठवावा, तसेच वेळेवर मदत मागणे हा सुरक्षेसाठी अत्यावश्यक उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅडव्होकेट सोनाली मेश्राम यांनी मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक हिंसेचे प्रकार समजावून सांगत महिलांना उपलब्ध कायदेशीर संरक्षणाची माहिती दिली.
महिला व बालविकास विभागाच्या रुपाली काळे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम, POCSO कायदा, तसेच पोटगी हक्कांबाबत माहिती दिली. बालविवाहासारख्या अमानवी प्रथा समाजातून निर्मूलनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
अंगणवाडी सुपरवायझर झरकर मॅडम यांनी महिला आणि मुलींवरील घरगुती अत्याचारांविषयी मार्गदर्शन केले. अंगणवाडीमार्फत महिलांना आधार मि असाळावा, हे प्रत्येक कार्यकर्तीचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रियंका असुटकर, संरक्षण अधिकारी, यांनी सुरक्षित-असुरक्षित स्पर्श, बालविवाह प्रतिबंध आणि दत्तक प्रक्रिया याविषयी माहिती देत पालक आणि समुदायाने सजग राहण्याचे महत्त्व मांडले.
अमिर्झा ग्रामपंचायतीचे सरपंच भैसारे सर यांनी गावातील महिलांनी अशा उपक्रमांत सहभागी होऊन आपले हक्क ओळखावेत, असे आवाहन केले. ममता संस्थेच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्विनी हेमके यांनी केले, तर आभार मोनाली बोरकर यांनी केले. उपक्रमाच्या आयोजनात Outreach Workers पूजा गेडाम, युवराज मेश्राम आणि दामिनी राजगडे यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
महिलांच्या सशक्तीकरणासाठी उपयुक्त ठरलेला हा कार्यक्रम अमिर्झ्यात उत्स्फूर्त प्रतिसादासह पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here