आंबेटोला गावात बिबट्याचा थरार ; कोंबडी वाचवताना शेतकरी गंभीर जखमी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २६ : कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण प्रकार घडला. आंबेटोला येथे कोंबडी घेऊन पळणाऱ्या बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न करीत असताना कालिराम धोंडू हलामी (वय ५०) या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालत गंभीर जखमी केले.
रात्री १२ ते १ वाजेदरम्यान बिबट्याने कोंबडी पकडून नेण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच हलामी यांनी आरडाओरड करून बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यात त्यांच्या हात-पायांवर खोल जखमा झाल्या. माहिती मिळताच कुरखेडा वन उपक्षेत्र अधिकारी गोपुळवाड, क्षेत्र सहाय्यक एस. एल. कंकलवार, वनरक्षक एस. डब्ल्यू. गोनाडे, एम. के. दुधबळे व वनमजूरांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी हलामी यांना वनविभागाच्या वाहनातून तत्काळ शासकीय रुग्णालय, कुरखेडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, त्याच दिवशी संध्याकाळी व रात्री जांभूळखेडा गावात पुन्हा बिबट्याच्या हालचाली दिसल्याची माहिती मिळताच वनविभागाने सतर्कता वाढवली. रात्री ९ ते ११.३० या वेळेत गावात दोन वेळा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. वनरक्षक कु. सपना वालदे आणि त्यांच्या टीमने गावकऱ्यांना सावधगिरीचे नियम, रात्री एकटे बाहेर न पडणे, गुरेढोरे सुरक्षित जागी बांधणे आदींचे मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले.
परिसरात वनविभागाची गस्त तीव्र करण्यात आली असून, बिबट्याच्या हालचालींवर विभागाचा सतत लक्ष आहे. गावकऱ्यांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














