– 24 तासांत उभारले अत्याधुनिक केंद्र; सीमाभागातील सुरक्षेला नवे बळ
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील आणि दुर्गम परिसरात सुरक्षा वाढविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत उपविभाग भामरागड अंतर्गत फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे. छत्तीसगड सीमेलगत केवळ ७ किमी अंतरावर असलेल्या या गावातील नागरिकांचा सर्वांगीण विकास साधणे आणि माओवादी हिंसक कारवायांना प्रतिबंध करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्य शासनाने 28 ऑक्टोबर 2025 रोजी मंजुरी दिल्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या आत या केंद्राची उभारणी करण्यात आली.
उद्घाटन सोहळा अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या भागातील नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने हे मदत केंद्र मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला.
हे केंद्र उभारण्यासाठी 1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, 500 विशेष पोलीस अधिकारी, नवनियुक्त पोलीस जवान व कंत्राटदार मिळून एकूण 1050 मनुष्यबळाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 4 जेसीबी, 2 पोकलेन, 7 ट्रेलर, 25 ट्रक यांच्या सहाय्याने केवळ 24 तासांत अत्याधुनिक सोयींनी युक्त केंद्र उभारण्यात आले. मदत केंद्रात 12 पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, जनरेटर शेड, आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, स्वच्छतागृहे, मॅक वॉल, बी.पी मोर्चा, तसेच 8 सँड मोर्च्यांची उभारणी करण्यात आली असून केंद्राच्या सुरक्षेसाठी 300 हून अधिक पोलीस, एसआरपीएफ, सीआरपीएफ आणि विशेष कमांडोज तैनात करण्यात आले आहेत.
फुलनार–कोपर्शी परिसरात वर्षानुवर्षे अडकलेले मोबाईल टॉवरचे काम या केंद्राच्या स्थापनेमुळे आता वेगाने पूर्ण होणार असून भविष्यात अतिदुर्गम परिसरात एसटी बससेवा व नवीन रस्ते उभारणीस प्रोत्साहन मिळणार आहे. मदत केंद्र उभारणीदरम्यान आयोजित जनजागरण मेळाव्यात महिलांना साड्या, चप्पल, पुरुषांना घमेले, ब्लॅंकेट, स्वयंपाक भांडी संच, युवकांना क्रीडा साहित्य, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, तर लहान मुलांना क्रिकेट संच आणि व्हॉलीबॉल साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
2023 पासून सुरू असलेल्या सुरक्षा बांधणी अभियानातील हे सलग आठवे नवीन पोलीस मदत केंद्र असून पेनगुंडा (11 डिसेंबर 2024), नेलगुंडा (30 जानेवारी 2025) आणि कवंडे (9 मार्च 2025) नंतर या केंद्रामुळे संपूर्ण पट्ट्यातील सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. कार्यक्रमाला अपर पोलीस महासंचालक डॉ. छेरिंग दोरजे, डीआयजी अजय कुमार शर्मा, एसपी नीलोत्पल, सीईओ सुहास गाडे, 37 बटालियनचे कमांडंट दाओ इंजीरकन कींडो, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साईं कार्तिक, गोकुल राज जी., एएसपी अनिकेत हिरडे, एसडीपीओ अमर मोहिते आणि अन्य अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) येथील नवीन पोलीस मदत केंद्रामुळे सीमाभागातील सुरक्षा अधिक सक्षम होणार असून स्थानिक नागरिकांच्या विकास प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.
#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














