– ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पंचायतची एकजूट
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २१ : गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब ग्राम पंचायत वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाश्रमदानातून रानखेडा येथील नाल्यावर वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. 20 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि पंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे 270 सिमेंट खाली बॅगांचा वापर करून हा बंधारा उभारला.
नाल्यात पाणी साठवून ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याचा पुरवठा स्थिर राहणार असून, उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. स्थानिक पाणीपातळी वाढविण्यासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
या श्रमिक उपक्रमात ग्राम पंचायत मौशिखांब च्या सरपंच सौ. रंजना डंबाजी पेंदाम, नोडल अधिकारी श्रीमती सिंधू घाडगे (बालविकास प्रकल्प अधिकारी, गडचिरोली), ग्राम पंचायत सदस्य सौ. वर्षा तिवाडे, गणेश दहलकार, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष चौधरी, पोलिस पाटील खुशाल नेवारे, ग्राम पंचायत अधिकारी खुशाल नेवारे, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक लडके, शिक्षक तोडासे, उसेंडी, खुशाल मडावी यांसह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, रोजगार सेवक रवी कुमरे, पाणीपुरवठा कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकरे व हेमंत मोंगरकर, तसेच रानखेडा येथील नागरिक लालाजी आवारी, चरण चौधरी, यादव चौधरी, जीवन कुरुडकर आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वांच्या श्रमदानातून तयार झालेल्या या वनराई बंधाऱ्यामुळे रानखेडा परिसरातील शेतांना दिलासा मिळणार असून, पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अशाच अनेक विकासात्मक उपक्रमांची अंमलबजावणी होणार असून, गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन ग्राम पंचायततर्फे करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews














