पैसा मिळाला तरच मत? लोकशाहीचा पाया डळमळीत करणारी धोकादायक प्रवृत्ती

15

पैसा मिळाला तरच मत? लोकशाहीचा पाया डळमळीत करणारी धोकादायक प्रवृत्ती
– सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा : “मतदार जागा झाला तरच बदल शक्य”
The गडविश्व
गडचिरोली, दि.१८ : “सामाजिक काम करा, लोकांसाठी धावा… पण निवडणूक आली की खिशात पैसा नसेल तर घरात बसा!” – गावागावांत पसरत चाललेल्या या कलुषित मानसिकतेने लोकशाहीचा गाभा हादरवला आहे. कारण आज निवडणूक म्हणजे विकास, लोकसेवा आणि कार्यक्षमता यांचा खेळ नसून, उधळल्या जाणाऱ्या पैशांचा आणि मतदार खरेदीचा मेळा बनल्याचे वास्तव उघड झाले आहे.
गत काही वर्षांत निवडणुकांच्या काळात खुलेआम पैशांचे वाटप, पार्ट्या, पेट्रोलभत्ता, भेटवस्तू, घरपोच ‘पॅकेट’- अशा असंख्य प्रकारांनी मतदारांची दिशाभूल होत आहे. “काम शून्य, पण नोटांची गड्डी मिरवणारे उमेदवार पुढे जातात; आणि वर्षभर समाजकारण करणारे कार्यकर्ते पैशाअभावी हरतात” अशी चर्चा आता प्रत्येक चौकात ऐकू येते.
स्थानिक स्तरावर अनेक तरुण, स्वयंसेवक, समाजसेवी कार्यकर्ते दिवसरात्र लोकांसाठी धावपळ करतात. कोणी आजारी पडले तर दवाखान्यात धाव घेणारे, कोणाचे दस्तऐवज अडकले तर शासनदरबारी पाठपुरावा करणारे… अशा लोकांना मात्र मतदानाच्या दिवशी अपेक्षित पाठिंबा मिळत नाही. कारण मतदारांच्या मनात “जेवढा पैसा, तेवढे मत” ही विकृत संकल्पना खोलवर रूजत चालली आहे.

तज्ज्ञांचे स्पष्ट मत – “निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे, तर स्वतःच्या हितासाठी गुंतवणूक करतात. पदावर गेल्यावर हा पैसा ते दहापट वसूल करतात. मग सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी वेळ कोण देणार?”

गावोगावच्या बैठका, गावकऱ्यांच्या चर्चांमध्ये एकच प्रश्न घुमत आहे- मतदार बदलले नाहीत तर समाज कसा बदलेल? पैसे घेऊन मतदान करणारा प्रत्येक मतदार आपल्या स्वतःच्या विकासाला, मुलांच्या भविष्यास, गावाच्या प्रगतीला कुलूप लावत आहे. भ्रष्ट उमेदवारांना संधी देऊन लोकशाही केवळ नावापुरती राहते; सत्ता पैशाच्या बळावर चालणाऱ्यांच्या हातात जाते.

सामाजिक कार्यकर्त्यांचे मत स्पष्ट आहे- “लोकशाही मजबूत करायची असेल तर पैशाने नव्हे; कामाने, धडाडीने, प्रामाणिकपणे लोकांसाठी लढणाऱ्यांना संधी द्यावी. मतदार जागा झाला तरच खरी बदलाची पहाट उगवेल.”
निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या समाजासाठी हा गंभीर इशारा आहे. पैशाचा मोह बाजूला सारून काम करणाऱ्यांना मत देणे हीच काळाची गरज असून, त्यातूनच खरी लोकशाही मजबूत होणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Democracy #CleanPolitics #StopMoneyPower #VoteForChange #GoodGovernance #PoliticalReform #ResponsibleVoters #ElectionAwareness #SocialImpact #StrengthenDemocracy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here