– गडचिरोली-चंद्रपूर सीमेजवळील जिल्ह्यातील सर्वात मोठी मोहीम यशस्वी
The गडविश्व
सावली, दि. ११ : सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उपरी बीटातील गव्हारला परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘मायलेकी’सह चार वाघ अखेर वनविभागाने दोन दिवसांच्या अथक मोहिमेनंतर सुरक्षितरीत्या जेरबंद केले आहे.
ही मोहीम चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वाधिक यशस्वी बचाव मोहीम ठरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात एका वाघिणीसह तिचे तीन बछडे वारंवार शेतशिवारात दिसत होते. गुरांवर हल्ले, पशुधनाचे नुकसान आणि शेतकऱ्यांना होत असलेली भीती यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मानवी जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून वनविभागाने तातडीने विशेष रेस्क्यू मोहीम सुरू केली.
९ नोव्हेंबर रोजी उपरी बीटातील डोनाळा परिसरात वनविभागाने शिबिर उभारून शोधमोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी दोन बछड्यांना (एक मादी व एक नर) सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. मात्र वाघिणी आणि उरलेला एक बछडा न सापडल्याने दुसऱ्या दिवशी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली.
१० नोव्हेंबर रोजी आणखी एक मादी बछडा जेरबंद करण्यात वनकर्मचाऱ्यांना यश आले. आपल्या पिलांसाठी सतत भटकणारी ‘TF4’ नावाची वाघीण मात्र वनकर्मचाऱ्यांना बराच वेळ चकवत राहिली. अखेर दीर्घ प्रयत्नांनंतर या वाघिणीला देखील सुरक्षितरीत्या पकडण्यात आले.
दोन दिवसांच्या सलग रेस्क्यू ऑपरेशनमधून एकूण चार वाघ – एक वाघीण आणि तिचे तीन बछडे सुरक्षित जेरबंद करण्यात आले असून त्यांना काळजी व उपचारासाठी TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
ही मोहीम सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे (सावली) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. मोहिमेत शूटर घनश्याम नायगमकर, डॉ. कुंदन पोडचेलवार (पशुधन विकास अधिकारी, TTC चंद्रपूर), जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, RRU टीम, तसेच वनरक्षक आणि क्षेत्र सहाय्यक कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली फक्त दोन दिवसांत चार वाघ जेरबंद करण्याची कामगिरी ही वनविभागाच्या नियोजन, धैर्य आणि संघभावनेचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #वनविभाग #TigerRescue #SawaliForest #ChandrapurWildlife #OperationTF4














