‘संधीचा लाभ घ्या, आत्मविश्वासाने पुढे चला’ : पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचा महिला प्रशिक्षणार्थींना संदेश
– १०० महिला उमेदवारांनी घेतला पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : “मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा. स्वतःचे परीक्षण करून आत्मविश्वासाने आगामी पोलीस भरतीसह इतर स्पर्धा परीक्षांना सामोरे जा. मेहनत, शिस्त आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्कीच तुमच्यापर्यंत येईल असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ४५ दिवसीय निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराच्या एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे आज पार पडलेल्या समारोप समारंभा दरम्यान मार्गदर्शन करताना केले.
गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ४५ दिवसीय निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज या प्रशिक्षणाचा समारोप समारंभ एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे पार पडला.
२७ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षणात १०० महिला प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. हे शिबिर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना मैदानी चाचणी, लेखी परीक्षा, सायबर जनजागृती, महिला गुन्हे आणि नव्या कायद्यांची माहिती याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
प्रशिक्षणार्थींना गडचिरोली पोलीस दलाकडून लोअर, टी-शर्ट, शूज आणि लेखी परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास साहित्य मोफत वाटप करण्यात आले. प्रशिक्षणाअखेर झालेल्या परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनीही प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत १३ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सत्रे आयोजित केली असून, त्यातून २,५४३ युवक-युवतींनी सहभाग नोंदविला आहे. यापैकी २०५ उमेदवारांची विविध शासकीय विभागांमध्ये निवड झाली आहे. याशिवाय, “एक गाव – एक वाचनालय” या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ७३ ठिकाणी वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे.
सन २०२१ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ११,६९,७३५ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन प्रमुख, नागरी कृती शाखेचे प्रभारी पो.उ.नि. चंद्रकांत शेळके, तसेच अंतर्गत व बाह्य प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.














