– खड्डेमय मार्गावरून प्रवास म्हणजे जीवाशी खेळ
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ११ : धानोरा तालुक्यातील रांगी ते बेलगाव या मुख्य रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा संयम आता सुटू लागला असून, “या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?” असा खोचक सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे.
रांगीवरून गडचिरोली जिल्हा मुख्यालयाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर दररोज दुचाकी, चारचाकी, ट्रक आणि एस.टी. महामंडळाच्या बसेस धावत असतात. मात्र, रांगी ते बेलगाव दरम्यानचा रस्ता आता खड्ड्यांचा मार्ग बनला आहे. काही महिन्यांपूर्वी किरकोळ दुरुस्ती झाली असली तरी बहुतांश रस्ता तसाच उखडलेला असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषतः निमगाव फाट्याजवळील पहिल्या नाल्याजवळ मोठे खड्डे पडले असून चारचाकी वाहनचालकांना तारेवरची कसरत करत गाड्या काढाव्या लागतात. पावसाळ्यानंतर या रस्त्यावरील डांबरी थर पूर्णपणे नष्ट झाला असून केवळ ६ किलोमीटरच्या अंतरातच असंख्य खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे फुटल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
या मार्गाने दररोज शासकीय कर्मचारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, वनविभाग आणि बँक कर्मचारी गडचिरोलीकडे जातात. सततच्या खडतर प्रवासामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच, पण पाठीच्या व कमरेच्या वेदनांनी त्रस्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांनी प्रशासनाकडे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासन या रस्त्याची दखल कधी घेणार आणि रांगि–बेलगाव रस्ता पुन्हा कधी डांबरी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #RangiBelgaonRoad #Gadchiroli #PublicIssue #RoadRepair #Dhanoora














