अहेरीत ‘आशीर्वाद हॉस्टेल’वर महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई ; ९१ बालकांची सुटका

38

अहेरीत ‘आशीर्वाद हॉस्टेल’वर महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई ; ९१ बालकांची सुटका
– अनधिकृत बालगृह सील
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात नागेपल्ली (आय.टी.आय. जवळ) येथील ‘आशीर्वाद हॉस्टेल’ या अनधिकृत बालगृहावर आज (०४) महिला व बाल विकास विभागाने मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान एकूण ९१ बालकांची (४९ मुली व ४२ मुले) सुरक्षित सुटका करून सर्व बालकांना शासनमान्य वसतीगृहांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि अहेरीचे उपविभागीय अधिकारी तसेच सहायक जिल्हाधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, तहसीलदार व तालुका बाल संरक्षण समिती अध्यक्ष बालाजी सोमवंशी, बाल कल्याण समिती सदस्य दिनेश बोरकुटे, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ नुसार कोणतीही संस्था शासनमान्यता व नोंदणीशिवाय बालकांचे संगोपन करू शकत नाही. आशीर्वाद हॉस्टेलकडे आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे निष्पन्न झाल्याने महिला व बाल विकास विभागाने तत्काळ कारवाई केली. या अधिनियमाच्या कलम ४२ अंतर्गत अशा संस्थांचे संचालन करणाऱ्यांवर कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या पथकाने अहेरी तहसीलदार यांच्या उपस्थितीत नागेपल्ली येथील हॉस्टेलची तपासणी केली असता ९० पेक्षा अधिक बालकांचे वास्तव आढळले. संस्थेकडे कोणतेही वैध नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंचनामा करून सर्व दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले आणि संस्थेचे कामकाज तत्काळ थांबविण्यात आले.
बालकांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ कार्यवाही करत ४९ मुलींना शासकीय मुलींची आश्रमशाळा, खमनचेरू (ता. अहेरी) येथे आणि ४२ मुलांना एकलव्य आश्रमशाळा, अहेरी येथे दाखल करण्यात आले. ही कारवाई अहेरी पोलिस स्टेशनच्या सहकार्याने पार पडली असून बालकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
सदर प्रकरणात बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण एकक यांची संयुक्त बैठक उद्या सकाळी अहेरी येथे होणार असून, त्या बैठकीत सर्व बालकांना समितीसमोर सादर करण्यात येईल.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू यांनी सांगितले की, “बालकांच्या संरक्षणासाठी आणि कायदेशीर अंमलबजावणीसाठी अशा अनधिकृत संस्थांवर कठोर कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वेक्षण चालू असून, नियमबाह्य संस्था चालविणाऱ्यांवर कठोर शिक्षेची कार्यवाही करण्यात येईल.”
या कारवाईमुळे जिल्ह्यात अनधिकृत बालगृहांच्या संचालनावर आळा बसला असून, बालकांच्या संरक्षणाच्या दिशेने प्रशासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here