गडचिरोली : १० कोटींचा इनामी नक्षली नेता ‘भूपती’चा ६० सहकाऱ्यांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण

58

– अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शस्त्र खाली ठेवण्याची शक्यता
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीपर्यंत मजल मारणारा वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर आपल्या सुमारे ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने गडचिरोली तसेच आसपासच्या नक्षलग्रस्त भागात एकच खळबळ उडाली आहे.
भूपती हा नक्षल संघटनेचा प्रमुख रणनीतिकार आणि महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील प्लाटूनचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भूपती १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या शस्त्र खाली ठेवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची वृत्त विविध माध्यमांवरही प्रकाशित करण्यात आली असून, पोलिस दलात तसेच गडचिरोली परिसरात या घडामोडींबाबत चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षल संघटनेच्या शीर्ष नेतृत्वामध्ये मतभेद तीव्र झाले होते. ‘सशस्त्र संघर्ष निष्फळ ठरला, संवाद हाच पर्याय’ असे ठाम मत त्याने व्यक्त केले होते. शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू, घटता जनाधार आणि वाढती पोलिस कारवाई पाहता शस्त्रसंधीचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका त्याने घेतली होती.
या भूमिकेला काही नक्षल नेत्यांनी विरोध केला असला तरी, अखेरीस भूपतीने संघटनेतून बाहेर पडत आत्मसमर्पणाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्याचा गट सध्या पोलिसांच्या संरक्षणाखाली असल्याची माहिती मिळत असून शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन योजनेअंतर्गत त्यांना सुरक्षिततेची हमी दिली गेल्याचे कळते.
दरम्यान, गडचिरोली पोलिसांकडून या आत्मसमर्पणाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही, मात्र पोलिस सूत्रांनी या हालचालींची माहिती दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पणाची मालिका सुरूच आहे. जानेवारी महिन्यात भूपतीची पत्नी आणि वरिष्ठ नक्षल नेत्या तारक्का हिनेही आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे भूपतीचे आत्मसमर्पण हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा व निर्णायक टप्पा मानला जात आहे.
राज्य शासनाच्या “आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाला” यश मिळत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असून, नक्षल चळवळ सोडून शांततेचा मार्ग स्वीकारणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #NaxaliteSurrender #Bhupati #MallujuulaVenugopal #MaoistLeader #PoliceAction #DevendraFadnavis #SurrenderAndRehabilitation #MaharashtraPolice #BreakingNews #NaxalMovement #PeaceInitiative #SecurityForces #MaoistConflict #NewsUpdate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here