– १८ जणांविरोधात गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : गडचिरोली शहरात असलेल्या वैनगंगा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. (र.नं. ३१८) मध्ये तब्बल २.८३ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. संचालक मंडळ व लेखापालांनी नियम मोडून ठेवीदार व सभासदांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घोटाळा कसा झाला?
– २०१२ ते २०२० दरम्यान संचालक मंडळाने सभासदांना तारणाशिवाय कर्जवाटप केले.
– वसूल न झालेली १.३२ कोटी रुपयांची कर्जे कोणतीही कायदेशीर मंजुरी न घेता निर्लेखन करण्यात आली.
– एलआयसी धारकांच्या पॉलिसी गहाण ठेवून संस्थेने थेट एलआयसीकडून कर्ज उचलले व व्याजाच्या १.५० कोटी रुपयांचा बोजा संस्थेवर टाकला.
– या निर्णयांमुळे संस्थेला एकूण २.८३ कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले.
घोटाळा उघडकीस कसा आला?
लेखापरीक्षक श्रेणी-२, सहकारी संस्था अहेरी येथील गजेंद्र काळे यांनी २०१५ ते २०२३ या आठ वर्षांच्या चाचणी लेखापरीक्षणात ही प्रचंड अनियमितता उघडकीस आणली. त्यांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार केली होती. तपासानंतर अखेर २४ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
दरम्यान ज्यांच्यावर कारवाई झाली त्यामध्ये त्या काळातील अध्यक्षा सौ. गीता बोरकुटे, उपाध्यक्षा सौ. आशा राऊत, कु. चेतना ठाकुर, १५ संचालिका, तज्ञ संचालक भास्कर खोये आणि लेखापाल राजेंद्र भोयर यांच्यावर भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकारामुळे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या कार्यपद्धतीवर व विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून इतरही पतसंस्थांना धडकी भरल्याचे बोलल्या जात आहे. पुढील चौकशी वेगाने सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews #gadchirolipolice #Gadchiroli #Scam #CooperativeBank #FinancialFraud #Corruption #BreakingNews














