धानोरा : वन्यजीव शिकारीचा मोठा पर्दाफाश, सात आरोपी अटकेत
– घरातून मांस जप्त, वनविभागाची धडक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात वन्यजीवांची निर्दय शिकार करून मांस विक्री करणाऱ्या टोळीवर २६ सप्टेंबर रोजी वनविभागाने मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, घराच्या बाजूच्या पाण्याच्या खड्यात नायलॉनच्या पोत्यामध्ये लपवून ठेवलेले वन्यजीवांचे मांस जप्त करण्यात आले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण धानोरा सुमित पुरमशेट्टीवार आणि क्षेत्र सहाय्यक आर. एम. नरुले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर व दक्षिण धानोरा परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. या वेळी विलास वासुदेव उईके (रा. लांगटोला) यांच्या घराची झडती घेतली असता शिकारीचा पुरावा सापडला. दरम्यान पुढील चौकशीत उईकेसह किरपालसिंग भगतसिंग डांगी (रा. पेटतुकुम, ता. आरमोरी), किशोरा बाबुराव हलामी (रा. धानोरा), महेश भिमराव पावे (रा. धानोरा), प्रकाश आनंदराव वाघाडे (रा. धानोरा), सुनिल रुषी गावडे (रा. पवनी) आणि रमेश रामसिंग मडावी (रा. धानोरा) यांना अटक करण्यात आली.
सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील चौकशी मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार, उपवनसंरक्षक आर्या व्ही. एस. आणि सहाय्यक वनसंरक्षक (जकास) अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कारवाईत वनरक्षक हितेश मडावी, मिलिंद कोडप, कु. सिमा सिडाम, कु. लिना गेडाम, कु. भुमा सय्याम, कु. किरण रामटेके आदींचा सहभाग होता.
वन्यजीवांची शिकार हा कायद्याने दंडनीय व गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारांची माहिती तात्काळ विभागाला कळवावी असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #crimenews #WildlifeCrime #Gadchiroli #Poaching #ForestDepartment #WildlifeProtection #MaharashtraNews #BreakingNews #FrontPage #CrimeNews #ForestAct #WildlifeAct #GadchiroliNews #Conservation #StopPoaching














