– शेकडो ओबीसी बांधवांची शासनाला मागणी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०९ : महाराष्ट्र शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात कुरखेडा तालुक्यातील शेकडो ओबीसी बांधवांनी आज उपविभागीय अधिकारी अनुष्का शर्मा यांच्या मार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, आधीच सुमारे ३५० पेक्षा अधिक जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असून, त्यांना अजूनही पुरेसे प्रतिनिधित्व व न्याय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सामावून घेणे हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय ठरणार आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या सबळ असलेल्या मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण देणे ही राज्यघटनेच्या तत्त्वांनाही विरोधी बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
ओबीसी प्रवर्गातील आधीच मर्यादित संधींवर धोका निर्माण होऊन शिक्षण, शासकीय नोकऱ्या व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधित्व मूळ ओबीसींना मिळणे अशक्य होईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा मोठा संघर्ष उभा राहील, असा इशारा देण्यात आला.
यावेळी कुरखेडा ओबीसी समाज संघटना तालुका अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ आदे, शहर विचार मंच अध्यक्ष माधवजी निरंकारी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, भाजप तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, काँग्रेस तालुका अध्यक्ष जीवन पाटील नाट, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, डॉ. जगदीश बोरकर, माळी समाज संघटना अध्यक्ष घनश्याम सोनुले, प्रा. विनोद नागपूरकर यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर व शेकडो ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














