धानोऱ्यात महसूल आबादीवरील अतिक्रमण कायम

158

– प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि.२५ : शहरातील महसूल विभागाच्या आबादीच्या जमिनींवर वाढत चाललेले अतिक्रमण हा गंभीर प्रश्न बनला असून, याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमध्ये होत आहे.
२०१५ पूर्वी ग्रामपंचायत असलेले धानोरा नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्यानंतर शहराची लोकसंख्या वेगाने वाढली. त्यानंतर रिकाम्या महसूल जागांवर नागरिकांनी हळूहळू अतिक्रमण करून झोपड्या व पक्की घरे बांधणे सुरू केले. विशेष म्हणजे, बसस्टँडलगत असलेल्या सर्वे क्रमांक ५२५ या महसूल जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून रोडटच असलेली ही महत्वाची जमीन कब्जात गेली आहे.
महसूल व नगरपंचायत प्रशासनाला या अतिक्रमणाची पूर्ण माहिती असूनही, केवळ नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“बसस्टँडला लागून असलेली ही महत्वाची जागा नगरपंचायतीच्या ताब्यात राहायला हवी होती. मात्र, अतिक्रमण वाढत चालले असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या ठिकाणी नागरिकांसाठी मनोरंजन केंद्र किंवा सामुदायिक सुविधा केंद्र उभारले जावे,” अशी जोरदार मागणी धानोऱ्यातून होत आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice
#धानोरा #अतिक्रमण #नगरपंचायत #महसूलविभाग #नागरिकांचा_रोष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here