The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, दि. २५ : महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, नैनपूर येथे शनिवारी तान्हा पोळा उत्सव पारंपरिक थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गावकरी, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा सोहळा संस्कृती व शिक्षणाचा अद्भुत संगम ठरला.
या कार्यक्रमाला आरमोरीचे आमदार रामदास मसराम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि विशेष भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाला माजी सभापती परसराम टिकले, सौ. प्रज्ञा तिघरे, लायन्स क्लब ब्रह्मपुरीचे अध्यक्ष इं. गणेश सामृतवार, चेअरपर्सन इं. रामकुमार झाडे, सचिव किरण झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी कमलेश गिन्नलवार, गंगाधरजी चांदेवार (माजी पोलीस पाटील), शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम मेश्राम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आमदारांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना तान्हा पोळ्याचे शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली मोलाईचा जंगल ही नाटिका, वो किसना है या गाण्यावरचे नृत्य, स्वागत गीत तसेच कु. रेणू तिघरे हिने साकारलेले शिवलिंग पिंड या कलाकृतींना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. नंदीबैल सजावट स्पर्धेत कुंज नामदेव चांदेवार याने संत गोराकुंभाराची भूमिका साकारून प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक पुर्वांशी कमलेश मुळे आणि तृतीय क्रमांक रुद्र नितीन देवगिरीकर यांना मिळाला.
विशेष म्हणजे लूणकरन चौधरी यांनी वाढदिवसानिमित्त शाळेला सहा खुर्च्या भेट देण्याचे जाहीर केले. वनविभाग अधिकारी व लायन्स क्लब ब्रह्मपुरी यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश तुपट यांनी केले, तर आभार सौ. अपर्णा जडे यांनी मानले. लायन्स क्लब ब्रह्मपुरी आणि शिक्षकवृंदाच्या सहकार्याने हा पारंपरिक सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. नैनपूर शाळेने या उत्सवातून परंपरा, संस्कृती आणि शिक्षणाचा आदर्श संगम साधत प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #desaiganj














