– ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिक संतप्त
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. २४ : गोठनगाव फॉरेस्ट चेकपोस्ट ते जांभूरखेड़ा या अवघ्या ३ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात ठेकेदाराच्या बेपर्वाईमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता खोदून ठेवला, मात्र वेळेत डांबरीकरण पूर्ण न केल्याने आज हा मार्ग चिखल आणि खोल गटारांनी भरलेला जीवघेणा रस्ता बनला आहे.
शनिवारी रात्री तीन मोठे ट्रक दलदलीत खोलवर अडकले. परिणामी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली व शेकडो वाहनांच्या तासन्तास रांगा लागल्या. शेतकरी, विद्यार्थी, मजूर व रुग्णवाहिका या मार्गावर अडकून प्रचंड हाल झाले. शेतकऱ्यांचे पीक वेळेत बाजारपेठेत पोहोचले नाही, तर विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये पोहचणे कठीण झाले.
नागरिकांनी ठेकेदारावर मनमानी, भ्रष्टाचार आणि गंभीर हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत. “पावसाआधी रस्ता वापरायोग्य ठेवणे ही ठेकेदाराची जबाबदारी होती, मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले,” असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला.
“जर प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारू. जीव धोक्यात घालून रोज या रस्त्याने प्रवास करणे आता शक्य नाही,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














