भटक्या जमातीच्या आरक्षणावर आणली गदा : ढिवर – भोई समाज संघटना आक्रमक

53

– जिल्हाधिकारी यांचे मार्फत आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावात पारंपारिक मच्छिमार ढिवर भोई केवट कहार बेस्ता ओडेवार इत्यादी भटक्या जमाती समाजाचे स्वतंत्र वस्ती – मोहल्ले असून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असतांनाही शासनाने अडीच टक्क्यांवरुन कमी करून दोन टक्के आरक्षण मर्यादा केल्याने ढिवर समाजात तीव्र रोष निर्माण झाला असून शासनाने सदरचे आरक्षण पुर्ववत करावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक भूमिका घेवू असा निर्धार गडचिरोली जिल्हा ढिवर भोई केवट व तत्सम जमाती समाज संघटनेने केला आहे.
सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा मच्छिमार संघाच्या कार्यालयात गडचिरोली जिल्हा ढिवर/भोई, केवट व तत्सम जमाती संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संयोजक क्रीष्णा मंचर्लावार, जिल्हाध्यक्ष प्रा. भाग्यवान मेश्राम, कार्याध्यक्ष सुनील बावणे, जिल्हा सचिव किशोर बावणे, सल्लागार रामदास जराते, पी.जे. सातार, बालाजी सोपनकर, जयश्रीताई जराते, सुधाकर गद्दे, प्रभाकर बावणे, फुलचंद वाघाडे, राजेंद्र मेश्राम, प्रकाश मारभते, डंबाजी भोयर, चंद्रकांत भोयर, रेवनाथ मेश्राम, देवेंद्र भोयर, महेंद्र जराते व इतर पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील भटक्या जमाती – ब प्रवर्गाचे कमी केलेले आरक्षण तातडीने पूर्ववत करण्यासाठी व्यापक जनसंघर्ष उभा करणे, शासनाकडून झालेल्या अन्यायाची जाणीव समाज बांधवांना करून देवून आरक्षणाबाबत जागृती निर्माण करणे, तालुका समितीत्यांच्या बैठक घेणे व सक्रीय कार्यकर्त्यांना संघटनेत जबाबदारी देणे याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेच्या वतीने मंगळवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here