– उत्पादन घटण्याची भीती
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : खरीप हंगामातील रोवणीचे काम आटोपल्यानंतर धान पिकांच्या वाढीसाho ठी आवश्यक असलेले युरिया खत तालुक्यात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. खतासाठी शेतकरी गावोगाव, दुकानादुकान भटकंती करत आहेत. मात्र कुठेही खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत.
यावेळी युरिया उपलब्ध न झाल्यास पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने तालुक्यात पुरेसा युरिया खताचा पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी भाजप जिल्हा महामंत्री व माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे यांनी केली आहे.
खताचा तुटवडा जाणवताच काही विक्रेते नफेखोरीच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांची लूट करतात. शासकीय दराऐवजी जास्तीचे पैसे वसूल करून काळाबाजार सुरू होतो. परंतु अडचणीत सापडलेला शेतकरी तक्रारीकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने विक्रेत्यांवर सतत नजर ठेवत दुकानातील स्टॉक व दरफलक दर्शनी भागात लावले आहेत की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.
खाजगी विक्रेत्यांच्या तुलनेत सहकारी संस्था मार्फत शेतकऱ्यांना शासकीय दरात खत उपलब्ध होण्याची अधिक शाश्वती असते. त्यामुळे युरिया खताचा पुरवठा सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर करावा, असे आवाहन गोटेफोडे यांनी केले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये या तुटवड्यामुळे चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून युरिया खताची उपलब्धता करून द्यावी, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews
