– आरोपीकडून मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून आष्टी पोलिसांनी येनापूर येथील घरफोडीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी सकाळी येनापूर येथील रहिवासी मायाबाई माधव अलचेट्टीवार घराला कुलूप लावून शेतावर गेल्या असताना, अज्ञात आरोपीने कुलूप तोडून घरातून १५ हजार रुपये रोख व एक तोळ्याची सोन्याची पोत (किंमत सुमारे ४० हजार) असा ऐवज लंपास केला. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने शेजारी राहणारे विस्तारी नागन्ना मेकर्तीवार यांच्या घरातही घरफोडी करून १० हजार रुपये रोख व १३ हजाराचा मोबाईल असा एकूण ७८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
गुन्ह्यात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याने तपास पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे दोन तपास पथके तयार करण्यात आली. अखेर १२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी निकेश देविदास मेश्राम (वय २८) रा. लखमापूर बोरी, ता. चामोर्शी, ह.मु. वंजारी मोहल्ला, गडचिरोली याला अटक केली.
आरोपीकडून चोरीस गेलेले सोने, २५ हजार रुपये रोख, दोन मोबाईल फोन आणि चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली, आष्टी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. विशाल काळे यांच्या नेतृत्वात पोउपनि. गोकुलदास मेश्राम, पोहवा. रतन रॉय, भाऊराव वनकर, पोअं. रविंद्र मेदाळे व संतोष श्रिमनवार यांनी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews
#गडचिरोलीपोलीस #आष्टीपोलीस #घरफोडी #चोरी #गुन्हेवार्ता #क्राइमन्यूज #गडचिरोली #पोलिसकारवाई #पोलीसअटक #मुद्देमालहस्तगत #GadchiroliPolice #AheriPolice #HouseBreak #Theft #CrimeNews #Gadchiroli #PoliceAction #Arrest #SeizedProperty #CrimeReport
