– १०० टक्के अनुदानावर ऊन-पावसापासून संरक्षण, आर्थिक उन्नतीला चालना
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : चामड्याच्या वस्तू व पादत्राणे दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांना ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण देत त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी शासनाच्या १०० टक्के अनुदानातून पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. याचा लाभ आता ग्रामपंचायत, नगरपालिका, अ व ब वर्ग नगरपालिका, छावणी क्षेत्र आणि महानगरपालिका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार आहे.
सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी अनुसूचित जातीतील गटई कामगारांना आवाहन केले की, “ही योजना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची संधी आहे. पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करून लाभ घ्यावा.”
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अधिकृत जातीचा दाखला, मागील आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, स्टॉलसाठी जागेचा भाडेपट्टा/करारपत्र/खरेदी खत, ग्रामसेवक किंवा सचिवांचे गटई कामाचे प्रमाणपत्र, व्यवसाय प्रमाणपत्र, ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसाय करतानाचा फोटो आणि अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे.
पात्रतेचे निकष
– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जाती संवर्गातील असावा.
– ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न ₹४०,००० पेक्षा कमी, तर शहरी भागातील ₹५०,००० पेक्षा कमी असावे.
– वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
– स्टॉलसाठी जागा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून अधिकृतरीत्या मिळालेली असावी.
पात्र अर्जदारांनी परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे शासनाच्या विहित नमुन्यात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #गडचिरोली #गटईकामगार #पत्र्याचेस्टॉलयोजना #सामाजिकन्यायविभाग #आर्थिकउन्नती #अनुदानयोजना #Gadchiroli #SocialWelfare #LivelihoodSupport #SCWelfare #GovernmentScheme
