– कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संवर्धनावर भर
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : खनिज उत्खननामुळे प्रभावित ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी गडचिरोली जिल्हा खनिज प्रतिष्ठानतर्फे तब्बल १५० कोटी रुपयांचे व्यापक विकास नियोजन आखण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निधी प्रत्यक्ष (खनिज स्थळांपासून १५ किमीपर्यंत) तसेच अप्रत्यक्ष (१५ ते २५ किमीपर्यंत) प्रभावित क्षेत्रांतील सर्वांगीण विकासासाठी वापरला जाणार आहे.
या योजनेत कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, पर्यावरण संरक्षण आणि मूलभूत सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. रस्ते, सिंचन, नगरविकास आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
आरोग्य क्षेत्रात मोठी उडी
उपकेंद्र स्तरावर प्रसूतीगृहे, मोबाइल रक्तसंकलन आणि एक्स-रे युनिट्स, अतिरिक्त रुग्णवाहिका, तसेच एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३३ उपकेंद्रे व ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसवली जाणार आहेत.
कृषी व सिंचन विकास
सिंचन सुविधा वाढवणे, सौर पंप वाटप, मका व कापूस औजार बँक, सौरऊर्जेवर चालणारे कुंपण यांसारख्या योजना राबवल्या जातील.
शिक्षण आणि कौशल्य विकास
स्मार्ट शाळा, डिजिटल वर्गखोल्या, कुक्कुटपालन, महिलांसाठी ई-कार्ट, पोहा व टोरी प्रक्रिया केंद्र, तसेच एटापल्ली येथे युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.
नगरविकास व पर्यावरण संवर्धन
नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी कचरा संकलन वाहने, एटापल्ली तलावाचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण, सौर दिवे बसविणे, वृक्षलागवड आणि मृदा-जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.
पायाभूत सुविधांवर भर
महत्त्वपूर्ण रस्त्यांचे मजबुतीकरण, नवीन पायाभूत सुविधा, तसेच सर्व खाणबाधित क्षेत्रांच्या दीर्घकालीन विकासासाठी पंचवार्षिक आराखडा आणि वार्षिक योजना तयार करून ती जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे.
जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी सांगितले की, “सर्व विभागांनी प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावेत. प्रगतीचे नियमित पुनरावलोकन करून खनिज प्रभावित भागातील नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #खनिजविकास #जिल्हाखनिजप्रतिष्ठान #ग्रामीणविकास #आदिवासीविकास #कृषीविकास #आरोग्यसेवा #शिक्षणविकास #पर्यावरणसंवर्धन #पायाभूतसुविधा #Gadchiroli #MiningDevelopment #RuralDevelopment #TribalDevelopment #Infrastructure #SustainableDevelopment
