गडचिरोली पोलिसांकडून आदिवासी विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, प्राविण्यप्राप्तांना गौरव

57

-‘पोलीस दादालोरा खिडकी’च्या माध्यमातून दुर्गम भागात विकासाचा स्पर्श
The गडविश्व
गडचिरोली, दि. ८ : गडचिरोली पोलिस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमांतर्गत आज एकलव्य सभागृहात दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरिंग दोरजे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमात एकूण ३०० हून अधिक नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी ५ शिलाई मशिन, १० स्मोकलेस चुल्हा, १० स्प्रे पंप तसेच टु-व्हिलर रिपेअर कोर्स पूर्ण केलेल्या २८ युवकांना रिपेअर किट, आणि ६१ विद्यार्थ्यांना सायकली वाटण्यात आल्या.
तसेच ‘प्रोजेक्ट प्रयास’ अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘वीर बाबूराव शेडमाके सामान्य ज्ञान स्पर्धा २०२४’ मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत तब्बल २३,९३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

गावाकडचा विद्यार्थीही मोठं स्वप्न पाहू शकतो’ – छेरिंग दोरजे

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दोरजे म्हणाले, “पोलीस व जनतेमधील विश्वास आणि सहकार्यामुळे गडचिरोलीतील माओवाद कमी होत चालला आहे. ग्रामीण भागात राहणं ही कमजोरी नसून शिक्षणाच्या बळावर आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. पोलिस दल तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”

‘प्रोजेक्ट उडान’मुळे युवक-युवतींना नवे क्षितिज

‘पोलीस दादालोरा खिडकी’अंतर्गत सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रमामुळे आतापर्यंत १३,९९७ युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय ७३७ शेतकऱ्यांना कृषी सहलींचा लाभ, १,२४० नागरिकांची डोळ्यांची शस्त्रक्रिया, आणि दुर्गम भागात ७१ वाचनालये सुरू करण्यात आली आहेत. ३,५७८ विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर व वेब डेव्हलपरचे प्रशिक्षणही देण्यात आले असून आतापर्यंत १०.७३ लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात पोलिस दल यशस्वी ठरले आहे.

पोलीसांसाठी नवे क्रीडांगण

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस कवायत मैदानात व्हॉलीबॉल व बास्केटबॉल मैदानाचा भूमिपूजन सोहळा देखील पार पडला. मा. अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले. पोलिसांसाठी हे मैदान शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे.

या कार्यक्रमाला पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी., अनिकेत हिरडे आणि विशाल नागरगोजे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
#GadchiroliPolice #PolicePublicBond #DadaloraKhidki #ProjectUdaan #ProjectPrayas
#TribalEmpowerment #StudentSupport #YouthDevelopment #ChheringDorje #GadchiroliDevelopment #CyclingForEducation
#SkillIndia #CommunityPolicing #VolleyballCourtInauguration #BasketballCourtInauguration #PoliceForPeople
#RuralEmpowerment #KnowledgeCompetition #EducationForAll #TribalYouth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here