– भात रोवणीच्या मोसमाचा फायदा घेत चोरट्यांचा हौदोस
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०८ : तालुक्यातील मुरुमगावात भरदुपारी एकाच वेळेस तीन घरांमध्ये घरफोडीची धक्कादायक घटना घडली. गावातील बहुतांश नागरिक भात रोवणीसाठी शेतात असताना, निर्जन वस्तीत अज्ञात चोरट्यांनी शिताफीने घरांचे कुलूप तोडून हजारो रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ही घटना ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ दरम्यान घडली. सर्वप्रथम सरस्वतीबाई गणपत गाणे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. त्यानंतर शोभाबाई चिंतामण मेश्राम यांच्या घरात धान्याच्या कोठीत लपवून ठेवलेले २० हजार रुपये, दोन चांदीच्या पायपट्ट्या, सोन्याचे दोन डोरले आणि २० मण्यांचा ऐवज चोरीला गेला.
तिसऱ्या घटनेत महेलसिंग उसेंडी यांच्या घरातील गोदरेज कपाट फोडून चोरट्यांनी आणखी ३ हजार रुपये लांबवले. तीनही ठिकाणी घराचे दरवाजे बंद असतानाही चोरांनी अचूक वेळ साधून सगळीकडे चोरी केली. घरामध्ये प्रवेश करताच कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त स्थितीत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस मदत केंद्रात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन ठेंग यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय राहुल चौधरी व त्यांच्या पथकाने श्वान पथकासह तपास सुरू केला आहे.
ही चोरी गावातील व्यक्तींनी केली की बाहेरगावच्या टोळीने? याबाबतची चर्चा सध्या मुरुमगावात चांगलीच रंगली आहे. भरदिवसा अशी धाडसी चोरी ही पोलिस यंत्रणेसमोरील गंभीर आव्हान मानली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Dhanora #Murumgaon #Theft #HouseBreakIn #PoliceInvestigation #PaddySeason #VillageNews #CrimeReport #TheGadVishva #गडचिरोली #धानोरा #मुरुमगाव #चोरी #घरफोडी #पोलीसतपास #भातरोवणी #गावबातमी #गडचिरोलीवृत्त #गुन्हेवृत्त #Theगडविश्व
