– मुख्याध्यापक-शिक्षक आढावा सभेत दिले मार्गदर्शन,१२ केंद्रांतील २१४ शिक्षकांची उपस्थिती
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २ : विद्यार्थ्यांना नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी सक्षम बनविणे ही काळाची गरज असून, शिक्षकांनी केंद्रस्तरावर जादा वर्गांचे नियोजन करून स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बालवयापासून तयार करावे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी केले.
गट साधन केंद्र, धानोरा यांच्या वतीने आयोजित मुख्याध्यापक व शिक्षक आढावा सभा गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना विद्यार्थ्यांचे सर्वांगीण शिक्षण प्रथम प्राधान्याने पूर्ण करत शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी युद्धपातळीवर करण्याचे आवाहन केले. शासन परिपत्रकांचे वाचन, दृकश्राव्य माध्यमातून मार्गदर्शन आणि शैक्षणिक कृतींची प्रभावी अंमलबजावणी यासाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
या सभेला प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी नरेंद्र मस्के, बाळकृष्ण अजमेरा, कुसुमताई भोयर, केंद्रप्रमुख अरुण सातपुते, मच्छिंद्रनाथ रामटेके, कृपाराम खोब्रागडे, मानस हिडको, हेमंत घोरापटिया, संध्या मोंठे, शीला सोमणकर, खुशाल बोदेले आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेत शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, परसबाग निर्मिती, आधार व यू-डायस प्लस अपडेट, विद्यार्थी सुरक्षा विकास समित्या, तक्रार पेटींची कार्यवाही, जिल्हा विज्ञान मेळावा, नाट्यउत्सव, मलेरिया जनजागृती, व्यसनमुक्त शाळा उपक्रम व इन्स्पायर अवॉर्ड यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सभेचे संचालन प्रेमिला दुगा यांनी केले तर आभार पौर्णिमा मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शर्मिष्का धाईत, सना अलमी, सचिनकुमार ब्राम्हणवाडे, धुलीराम ब्राह्मणकर, उषाकांत भांडेकर, नाजूक पाटील, आकाश चांदेकर व पुरुषोत्तम किरंगे यांनी मोलाचे सहकार्य केले.
या आढावा सभेला तालुक्यातील १२ केंद्रांतील एकूण २१४ मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थिती लावली होती.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice
