– प्रशासन आणि एसटी महामंडळावर संताप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०१ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा बस स्थानकाची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. मोडकळीस आलेली इमारत, अस्वच्छ परिसर, खराब स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव यामुळे प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना या दयनीय स्थितीचा जास्त त्रास होत आहे.
स्थानकाची इमारत अनेक वर्षांपासून देखभाल न झाल्यामुळे भिंतींना तडे गेले असून, छत गळत आहे. काही भाग कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. अशा धोकादायक स्थितीत दररोज शेकडो प्रवासी येथे बसची वाट पाहतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे.
या परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव असून, कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शौचालयांची अवस्था अत्यंत खराब आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. पावसाळ्यात चिखल आणि उघड्यावर थांबण्याची वेळ येते तर उन्हाळ्यात सावलीचा अभाव सहन करावा लागतो. या समस्यांकडे स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक प्रवाशांनी सांगितले की, बस वेळा अनियमित आहेत, वाहनांची स्थिती खराब असून कोणतीही माहिती उपलब्ध नसते. काही वेळा उशिरा रात्री पोहोचणाऱ्या महिलांना सुरक्षिततेचा मोठा प्रश्न भेडसावतो. “बस स्थानकात थांबणे म्हणजे आता जीव मुठीत घेऊन उभे राहणे,” अशी प्रतिक्रिया एका महिला प्रवाशाने दिली.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, सोशल मीडियावरही गेवर्धा बस स्थानकाच्या दुरवस्थेविरोधात मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बस स्थानकाची तात्काळ पुनर्बांधणी, परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली आहे. यासंदर्भात कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews
