– कारवाई न झाल्यास ८ ऑगस्टपासून तीव्र आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ०१ : कुरखेडा नगर पंचायत क्षेत्रातील रस्त्यांवरील अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाहतूक अडथळ्यांमुळे त्रस्त नागरिकांच्या आवाजाला आम आदमी पार्टीने बुलंद करत सात दिवसांत ठोस कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा ८ ऑगस्टपासून कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
दरम्यान पक्षाच्या वतीने १ ऑगस्ट रोजी नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी बांधलेली जनावरे, बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यांवरील घाण यामुळे आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले.
यापूर्वीही २१ जुलै रोजी आम आदमी पार्टीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती. महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५, भारतीय दंड संहिता १८६० आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ यांचा दाखला देत कठोर कारवाईचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर काही नोटिसा दिल्या गेल्या तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती दिसून आलेली नाही. नागरिकांनी प्रशासनाला व्हिडीओ आणि फोटो पुरावे दिले असतानाही स्थितीत सुधारणा झाली नाही.
“स्वच्छ भारत अभियानाचे ध्येयच धुळीस मिळत आहे,” असा आरोपही करत आम आदमी पार्टीने मागणी केली आहे की, रस्त्यांची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी. जनावरे बांधणाऱ्यांवर आणि अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वाहतूक अडथळे दूर करण्यासाठी नो-पार्किंग बोर्ड लावण्यात यावेत. निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात यावी. “नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित रस्त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर आम्ही नागरिकांसह रस्त्यावर उतरणार. त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावरच राहील.” असे स्थानिक नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
कुरखेड्यात नागरिकांमध्ये वाढता असंतोष पाहता ही समस्या भविष्यात मोठ्या जनआंदोलनाचे रूप घेऊ शकते, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews
