कोरचीच्या गल्लीबोळांत घाण, ढीगभर कचरा, तुंबलेले नाले ; लाखो रुपये खर्च तरी स्वच्छतेचा पत्ता नाही

63

– नगर पंचायतीचा ढिसाळ कारभार उघड, नागरिकांचा संताप
The गडविश्व
ता.प्र/कोरची, दि. २८ : कोरची नगर पंचायतीला स्थापनेला आठ वर्षे उलटून गेली, मात्र शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे चित्र आजही दयनीय आहे. दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करूनही कचऱ्याचे वर्गीकरण नाही, नाल्यांची स्वच्छता नाही आणि डासांचे साम्राज्य रोखण्याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही. कंत्राटदाराच्या ढिसाळ कामगिरीवर प्रशासनाने डोळे झाकले असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
शहरातील नवरगाव येथील डम्पिंग यार्डवर केलेल्या पाहणीत काच, प्लास्टिक, सेंद्रिय कचरा, टायर, लोखंड – सर्व एकाच ठिकाणी ढिगाऱ्याच्या स्वरूपात टाकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या स्पष्ट निर्देशांनुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक असतानाही, येथे त्याची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शहरातील नाले तुंबलेले असून त्यातून दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव वाढला आहे. फॉगिंग नाही, जंतूनाशक फवारणी नाही आणि नाल्यांमधील गाळ उपसण्याचे कामही ठप्प झाले आहे. परिणामी, मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढतो आहे.
विशेष म्हणजे, २०२३-२४ मध्ये नगर पंचायतीने २७ लाख रुपयांचा खर्च घनकचरा व्यवस्थापनासाठी दाखवला असूनही शहरात स्वच्छतेचा मागमूस नाही. कुरखेडा येथील खुशाल बनसोड या कंत्राटदाराला दरमहा २.५ लाख रुपये दिले जात असूनही, त्यांच्या कामगिरीवर कोणतीही प्रभावी देखरेख नाही. नवीन निविदा न काढता, निधीअभावाचे कारण पुढे करत पुन्हा त्याच कंत्राटदाराला काम देण्यात आले आहे, हे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करते.
नागरिकांचा संताप आता उफाळून आला असून, “लाखो रुपये खर्च होतात, पण शहरात फक्त घाणच घाण दिसते. हा पैसा नेमका कुठे जातो?” असा थेट सवाल नागरिक रमेश ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. “नगर पंचायत आणि कंत्राटदार आमची थेट फसवणूक करत आहेत,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडे घनकचरा व्यवस्थापनासाठी खर्चाच्या तपशीलाचे लोकांसमोर सादरीकरण, कंत्राटदाराची कामगिरी तपासून कारवाई, तातडीने नाल्यांची सफाई आणि फॉगिंग सुरू करणे, तसेच कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे अशी मागणी केली आहे.
कोरची नगर पंचायतीचा घनकचरा व्यवस्थापनातील अपयश हे फक्त बेजबाबदार कंत्राटदार नव्हे, तर प्रशासनाच्या उदासीनतेचाही गंभीर परिणाम आहे. जर या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष दिलं नाही, तर प्रशासनावरील नागरिकांचा उरलेला विश्वासही गमावण्याची शक्यता आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #कोरची #घनकचरा_व्यवस्थापन #नगरपंचायत_अपयश #स्वच्छता_अभियान #कंत्राटदार_बेजबाबदार #नागरिक_संताप #नाले_तुंबले #फॉगिंग_अभाव #प्रशासनाची_उदासीनता #स्वच्छ_कोरची #Korchi #WasteManagementFailure #MunicipalNegligence #SanitationCrisis #ContractorIrresponsibility #PublicOutrage #BlockedDrains #FoggingFailure #AdministrativeFailure #CleanKorchi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here