गडचिरोलीत मलेरिया निर्मूलनासाठी २५ कोटींचा विशेष टास्क फोर्स : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

58

– डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांची समग्र योजना
The गडविश्व
गडचिरोली/मुंबई, दि. २८ : मलेरियाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेसाठी विशेष टास्क फोर्सची पुनर्रचना करण्यात आली असून, त्याच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात आरोग्यतज्ज्ञ डॉ. अभय बंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील शासकीय समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेसाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ पासून तीन वर्षांसाठी प्रस्ताव सादर केला होता. सदर निधी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातून उपलब्ध करून देण्यात आला असून, आकांक्षित जिल्हा म्हणून निती आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त तरतूदही करण्यात आली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, गडचिरोली हा देशातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त सहा जिल्ह्यांपैकी एक आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या निरीक्षणात येथील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिकारशक्ती वाढल्याचे आढळून आल्याने, मलेरिया नियंत्रणासाठी तातडीने ठोस उपाययोजनांची गरज होती. या पार्श्वभूमीवर डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तीन वर्षांची समग्र योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रतिबंध, उपचार, जनजागृती व सर्वेक्षण यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्यास गडचिरोली जिल्ह्यात मलेरियावर नियंत्रण मिळवता येईलच, शिवाय आरोग्यसेवेचा दर्जाही भक्कमपणे उंचावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MalariaEradication #DrAbhayBang #CMFadnavis #PublicHealth #TribalWelfareProgram #TaskForce #MaharashtraHealth #GadchiroliDevelopment #ICMR #MalariaControlInitiative
#गडचिरोली #मलेरिया_निर्मूलन #डॉ_अभय_बंग #मुख्यमंत्री_फडणवीस #आरोग्यसेवा #आदिवासीघटक_कार्यक्रम #TaskForce #महाराष्ट्रआरोग्य #गडचिरोली_विकास #ICMR #मलेरिया_निर्मूलन_अभियान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here