गडचिरोली पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई ; नवेगावमध्ये ८ जणांवर गुन्हे दाखल

574

– १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने देशी, विदेशी व गावठी दारूची विक्री आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी गडचिरोली पोलीस ठाणे आणि पोमके कारवाफा येथील पोलीस पथकांनी संयुक्तरित्या मौजा नवेगाव (ता. धानोरा) येथे धाड टाकून आठ अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण ९९,४००/- रुपये किमतीची देशी व विदेशी दारू जप्त केली असून, ८५,०००/- रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १,८४,४००/- रुपये इतकी आहे. या प्रकरणात प्रभुदास शिशु गावडे, पंचफुला सुरेश नरोटे, मनिषा केशव तुमरेटी, निलीमा वसंत तुमरेटी, दिलीप शिशु गावडे, अशोक तुळशिराम पदा, जैराम बुधाजी गावडे आणि परसुराम पांडुरंग तुमरेटी (सर्व रा. नवेगाव, ता. धानोरा) या आठ जणांविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (इ) व ६५ (फ) अंतर्गत आठ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी, उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाफा जगदीश पांडे व गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोउपनि. मारबोनवार, पोहवा संजय पोल्लेलवार, पोहवा प्रेमकुमार भगत, पोहवा गुलाब कामतकर तसेच पोमके कारवाफा येथील पोउपनि. संतोष कदम, मपोउपनि. सुनिता शिंदे आणि अन्य अंमलदारांनी महत्त्वपूर्ण सहभाग घेतला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews
#गडचिरोलीपोलिस #दारूबंदी #अवैधदारूविरोधातमोहीम #पोलीसकारवाई #गडचिरोली_न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here