नोंदणीकृत शेतकरी बोनसच्या प्रतिक्षेत ; धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

50

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २१ : “भाताचे कोठार” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने हेक्टरी 20,000 रुपये इतका बोनस जाहीर करूनही, अनेक शेतकरी अजूनही त्या रकमेच्या प्रतिक्षेत आहेत.
राज्य शासनाने नागपूर हिवाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2 हेक्टरपर्यंतच्या शेतीसाठी बोनस योजना जाहीर केली होती. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी मंजूर करून शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात बोनसचे वितरण केवळ आधारभूत खरेदी केंद्रांवर धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांपुरतेच मर्यादित राहिल्याने, ऑनलाईन नोंदणीकृत पण धान विक्री न करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
या निर्णयामुळे हजारो नोंदणीकृत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. जवळपास सात महिने उलटून गेले तरी बोनस अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, खरीप हंगामाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रोवण्या सुरू झाल्या आहेत. काही भागांत अतिवृष्टीमुळे रोवण्या वाहून गेल्या आहेत, तर काही भाग अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. यामुळे शेतकऱ्यांना डब्बल पेरणीचा सामना करावा लागत आहे.
बियाणे, खते, औषधे, नांगरणी, चिखल करणे, मजुरी या सगळ्या शेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींसाठी पैशाची मोठी गरज आहे. अशा वेळी बोनस मिळाल्यास तो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरू शकतो.
धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाला आवाहन केले आहे की, ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ बोनसची रक्कम थेट खात्यावर जमा करण्यात यावी, जेणेकरून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना शेतीचा हंगाम सावरता येईल.
शासनाच्या घोषणा आणि शेतकऱ्यांची प्रत्यक्ष स्थिती यामध्ये असलेली दरी भरून काढण्याची गरज आता अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #धानोरा #शेतकरीबोनस #धानउत्पादक #शेतकऱ्यांचीहाक #सरकारकडूनमदत #कृषीबोनस #खरीपहंगाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here