– शेतकरी कामगार पक्षाचा आरोप — भ्रष्टाचार, दुर्लक्ष, तस्करी आणि फसवणुकीने गडचिरोली पोखरलं
The गडविश्व
गडचिरोली, दि.२१ : “विकासाच्या नावावर लुट, रोजगाराच्या नावावर फसवणूक आणि आदिवासींच्या हक्कांवर थेट गदा” अशा शब्दांत शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालक जिल्ह्यातील गोंधळावर सडकून टीका केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार जराते म्हणाले की, “गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक नैसर्गिक साधनसंपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी फडणवीस सरकारने लोहखनिजांच्या लुटीला मोकळं रान दिलं असून, जिल्ह्यातील मुलभूत प्रश्नांवर सरकारने पूर्णतः डोळेझाक केली आहे.”
गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. लाहेरीच्या शाळेत फक्त तीनच शिक्षक कार्यरत असून, हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. मलेरियासारख्या साथीने बळी गेले तरीही प्राथमिक आरोग्य सेवा अपुरी आहे.
भामरागड तालुक्यात एकही बेलिब्रिज पूर्ण झालेला नाही. कवंडे आणि अन्य दुर्गम गावांमध्ये आजही रस्ते नाहीत. कोरची, एट्टापल्ली, सिरोंचा, कुरखेडा आणि धानोरा तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था इतकी वाईट आहे की, वर्षभरात हे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. तरीही ३५० कोटींपेक्षा अधिक निधीचा हिशोबच नाही.
रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून १५ हजार टन खताची बेकायदेशीर तस्करी शेजारच्या जिल्ह्यात झाली आहे. आदिवासी विकास महामंडळ आणि मिलर्सने मिळून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचाही आरोप त्यांनी केला. दरम्यान, रेती आणि दारू तस्करीत जिल्ह्याने उच्चांक गाठल्याचंही नमूद केलं.

प्रभारी अधिकारी, बनावट वृक्षारोपण आणि “विकास”चा ढोल
गडचिरोलीत अनेक प्रमुख पदांवर प्रभारी अधिकारी कार्यरत असून निर्णयक्षमतेचा अभाव आहे. जिल्ह्याच्या जैवविविधतेने नटलेली जंगलं उद्ध्वस्त करून बनावट वृक्षारोपण दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाही गंभीर आरोप भाई जराते यांनी केला आहे.
जिल्ह्याच्या समस्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष नसल्याचे ठपके ठेवत, “जर आपण जिल्ह्यातील प्रश्न सोडवू शकत नसाल तर पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्या” अशी परखड मागणी रामदास जराते यांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolnews #Gadchiroli #ShetkariKamgarPaksha #FadnavisGovernment #GuardianDistrictCrisis #MineralLoot #EducationCrisis #FertilizerScam #TribalRights #DevelopmentOrDeception #CorruptionAllegations #RoadInjustice #HealthcareNeglect #IllegalSandLiquorTrade #ForestDestruction #FakeAfforestation #DemandResignation
#गडचिरोली #शेतकरीकामगारपक्ष #फडणवीससरकार #पालकजिल्हा_पण_विकासशून्य #खनिजलूट #शिक्षणहक्क #खतेतस्करी #भ्रष्टाचार